१२ वीच्या पेपर तपासणीवर शिक्षकांनी घातला बहिष्कार

१२ वीच्या पेपर तपासणीवर शिक्षकांनी घातला बहिष्कार

कोल्हापूर  प्रतिनिधी : राज्यातील शिक्षकांनी १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर झाली पाहिजे, या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शासनाने वाढीव तुकड्यांसाठी निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतला असला, तरी अद्याप कोणतीही तरतूद झालेली नाही. या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर टाकल्याच्या निषेधार्थ आज १२ वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकत शिक्षकांनी पेपर परत बोर्डाकडे सुपूर्द केले.

"मार्च अधिवेशनात निधी मंजूर करावा!"

शासनाने हा निधी हिवाळी अधिवेशनात मंजूर करणे आवश्यक होते, मात्र सरकारकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप शिक्षक कृती समितीने केला आहे. आता मार्च अधिवेशनात हा निधी मंजूर करून १४ ऑक्टोबरच्या शासन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. राज्यभरातील आमदारांनीही सरकारला पत्र पाठवून शिक्षकांच्या मागण्यांना समर्थन दिले आहे.

"१० वीच्या पेपर तपासणीवरही बहिष्कार!"

शिक्षक कृती समितीने ठाम भूमिका घेतली असून जोपर्यंत शासन निधी मंजूर करत नाही, तोपर्यंत १० वीच्या पेपर तपासणीवरही बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. आज विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर व सचिव सुभाष चौगुले यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात आमदार जयंत असगावकर, शिवाजी कुरणे, केदारी मगदूम, शिवाजी घाटगे, भाग्यश्री राणे, सचिन चौगुले, रत्नाकर माळी, चंद्रकांत बागणे, भारत शिरगावकर, संतोष पाटील, सचिन पाटील, सावंता माळी यांच्यासह शेकडो शिक्षक सहभागी झाले होते.

 आता सरकार शिक्षकांच्या या आंदोलनाची दखल घेते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!