जीबीएस व अन्य साथरोगचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पाण्याचे निर्जंतुकीकरण करूनच पुरवठा करावा - कार्तिकेयन एस

कोल्हापूर प्रतिनिधी : राज्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोम (जी.बी.एस ) विषाणूंचा तसेच अन्य साथीच्या रोगांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता पाण्याचे निर्जंतुकीकरण करून ग्रामपंचायत स्तरावर पिण्याच्या पाण्याचा स्रोतांची तसेच शाळा ,अंगणवाडी, घरे इत्यादी ठिकाणच्या पाणी नमुन्यांची गावातील प्रशिक्षित महिला, स्वयंसेवकामार्फत प्रत्येक महिन्यातून एकदा जैविक क्षेत्रीय तपासणी संचाद्वारे (FTK-H2S vials) तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केल्या आहेत.
ग्रामपंचायतीमधील शाळा, अंगणवाडीमधील व घरगुती नळ कनेक्शनचे पाणी नमुने ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात आलेल्या क्षेत्रीय तपासणी संच (FTK) चा वापर करून पाण्याची जैविक तपासणी करण्यात यावी. दुषित आलेल्या स्त्रोतांचे तात्काळ निर्जंतुकीकरण करून पाणी नमुने फ़ेर तपासणीसाठी सबंधित प्रयोगशाळेत पाठविण्यात यावेत. गावातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे , पिण्यासाठी वापरात असलेल्या स्त्रोतांची वर्षातून दोन वेळेस प्रयोगशाळेद्वारे जैविक तपासणी करण्यात यावी. दुषित आलेल्या स्त्रोतांचे तात्काळ निर्जंतुकीकरण करण्यात यावेत. गावातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या योजनांमधील पाणी गळतीमुळे व पिण्याच्या पाण्याच्यासाठी वापरात येणा-या इतर स्त्रोताभोवतालचा गळतीमुळे जैविकदृष्ट्या बाधित होणार नाही याकरीता पाणी गळती रोखण्याबाबत उपाय योजना करून निर्जंतुकीकरण केल्याची खात्री करून पाणी तपासणी करण्यात यावी व शुध्द पाणी पुरवठा होईल याची खात्री करण्यात यावी. पिण्याच्या पाण्यासाठी वापरात नसलेले व कायमस्वरूपी बंद असलेल्या स्त्रोतांवर अनुक्रमे पाणी “ पिण्यास वापरात नसणारा स्त्रोत " व “ कायमस्वरूपी बंद " असा संदेश स्त्रोतावर ऑइल पेंटद्वारे फ़लकावर दर्शविण्यात यावा. गावातील सर्व पाणी स्त्रोतांमधील पाण्याचे निर्जंतुकीकरण, पिण्याच्या पाण्याची तपासणी, स्त्रोतांचे सरंक्षण, पाणी पुरवठा योजनांमधील गळतीबाबत सर्व स्तरावर शुध्द पाणी पिण्याबाबत व GBS रोगामुळे होणा-या प्रादुर्भावाची लक्षणे व उपाय योजनाबाबत जनजागृती करण्यात यावी अशा सूचना ग्रामपंचायतींना दिल्या.
जीबीएस व अन्य साथ रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पाणीपुरवठा स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत विभाग यांनी समन्वयाने यावर कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत. याबाबत पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांना योग्य ती कारवाई करण्याबाबत प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग माधुरी परीट यांनी पत्राद्वारे निर्देश दिले आहेत.