१६ अंकी स्पीड गव्हर्नर नंबरच्या अटीमुळे वाहन पासिंग प्रक्रियेत अडथळा - शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघ

१६ अंकी स्पीड गव्हर्नर नंबरच्या अटीमुळे वाहन पासिंग प्रक्रियेत अडथळा -  शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघ

कोल्हापूर (प्रतिनिधी) - प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (RTO) वाहनांची पासिंग प्रक्रिया सध्या अडथळ्यात आली असून, यामागचं कारण म्हणजे स्पीड गव्हर्नर सर्टिफिकेटवर असलेला १६ अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (UIN). हा नंबर नसल्याचे कारण देत अनेक वाहनांची पासिंग थांबवली जात आहे, ज्यामुळे वाहनधारकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत असल्याचं मत शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघाने व्यक्त केले आहे. 

अनेक वाहनधारकांनी वाहन खरेदी करताना गाडी कंपनीकडून स्पीड गव्हर्नर घेतले असून, प्रमाणित फिटरकडून शासनाच्या मान्यतेनुसार त्याचे फिटींग देखील करण्यात आले आहे. तरीही, पासिंगच्या वेळी RTO कडून १६ अंकी UIN क्रमांक नसल्याचे सांगून गाड्या अडवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, या वाहनांची इतर सर्व कागदपत्रे – टॅक्स, इन्शुरन्स, पीयूसी, रिफ्लेक्टर व स्पीड गव्हर्नर सर्टिफिकेट – पूर्णपणे अद्ययावत असूनही वाहनांची तपासणी केली जात नाही.

यामध्ये एखादी गाडी अपघातग्रस्त झाली, तरी वैध इन्शुरन्स असूनही तो ग्राह्य धरला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे वाहनधारक आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जात आहेत. विशेष म्हणजे, या गाड्यांची यापूर्वीची पासिंग देखील याच कार्यालयातूनच झाली होती. त्यामुळे आता अचानक १६ अंकी क्रमांकाची अट लावण्याची जबाबदारी RTO कार्यालयाचीच आहे. यामुळे शासनाचा महसूलही थांबलेला आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघाच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये, १६ अंकी क्रमांकासंदर्भातील सुस्पष्ट नियमावली तयार करून वाहनधारकांना त्रासमुक्त सेवा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच, यावर त्वरित तोडगा न निघाल्यास वाहनधारकांकडून सर्व वाहने कार्यालयात जमा करून प्रशासनाला जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश परमार, उपजिल्हाध्यक्ष संदीप पाटील, शहराध्यक्ष योगेश रेळेकर, तालुकाध्यक्ष दत्ता फराकटे, उपतालुकाध्यक्ष अरुण पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.