ना दक्षिण.. ना उत्तर कोल्हापूरच्या विकासाचे पर्व "दक्षिणोत्तर" : श्री.राजेश क्षीरसागर

ना दक्षिण.. ना उत्तर कोल्हापूरच्या विकासाचे पर्व "दक्षिणोत्तर" : श्री.राजेश क्षीरसागर

कोल्हापूर प्रतिनिधी मुबारक आत्तार 

नृसिंह कॉलनी ते गंगाई लॉन रस्त्याच्या कामाचा शुभारंभ, २७ लाख ५० हजार निधी तात्काळ मंजूर

 काम करणाऱ्याच्या मागे जतना उभी राहते. निवडणुकीत जय - पराजय होत राहतात. परंतु, सामाजिक कार्याची शिकवण, लोकांना न्याय देण्याची धडपड सुरूच ठेवल्याने कोल्हापूर उत्तरसह कोल्हापूर दक्षिण मधील नागरिकांचेही पाठबळ वाढत चालले आहे. आगामी काळात ना दक्षिण.. ना उत्तर कोल्हापूरच्या विकासाचे पर्व "दक्षिणोत्तर" या माध्यमातून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासाची गंगा वाहती करण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली. गेली ४० वर्षे प्रलंबित असलेल्या नृसिंह कॉलनी ते गंगाई लॉन रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. या रस्त्याच्या कामास श्री.क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून रु.२७ लाख ५० हजार इतका निधी तात्काळ मंजूर करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना माजी नगरसेवक अमोल माने यांनी, गेली ४० वर्षे हा रस्ता प्रलंबित आहे. भागातील नागरिक त्रस्त्र होते. अनेकवेळा आंदोलने केली परंतु कोणीही याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. गेल्या दोन आठवड्यापूर्वी झालेल्या आंदोलनावेळी श्री.राजेश क्षीरसागर यांच्याशी शिवसेना पदाधिकारी यांनी संपर्क साधला असता त्यांनी सदर रस्त्यास निधी देण्याचे आश्वासन दिले होते आणि १५ दिवसांच्या आतच निधी मंजुरी होवून कामास सुरवात झाली. यातून श्री.राजेश क्षीरसागर यांची कार्यतत्परता दिसून येते. ४० वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न १५ दिवसात सोडविला. दक्षिण विधानसभा मतदारसंघ दोन गटांच्या वादातच अडकला आहे. त्यामुळे विकास कामे तर दूरच नागरिकांच्या मुलभूत सोईसुविधांचाही बोजवारा उडाला आहे. त्यामुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघात लक्ष घालून या मतदार संघातून निवडणूक लढवावी, या मतदारसंघातील नागरिक पाठीशी उभे राहतील, असा आग्रह यावेळी केला.

यावेळी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, दोन्ही मतदारसंघातील नागरिकांशी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे दक्षिण - उत्तर असा कोणताही मतभेद न करता लोकांना न्याय देण्याच काम करत आलो आहे. ४० वर्षे हा भाग विकासापासून वंचित असल्याची खंत वाटते. शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणी प्रमाणे ८० टक्के समाज कारणाचा मूलमंत्र वापरून कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर मध्ये विकास कामांची गंगोत्री प्रवाहित करू. ओपन जिम, खेळणी, क्रीडांगणे, वॉकिंग ट्रॅक, समाज मंदिरे, जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून दक्षिण मतदारसंघातील नागरिकांना विकास पर्वाकडे घेवून जाऊ. कॉंग्रेस - राष्ट्रवादीने नागरिकांना फक्त गाजर दाखविण्याचे काम केले आहे. पण, मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरला कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. परंतु, त्यासही विरोध करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली आहे. राजकारणात मर्यादा असाव्यात पण विरोधाला विरोध करून काही जन तोडपाणी, टक्केवारीत गुंतले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून विकासाच्या गोष्ठी होणे अशक्य आहे. आगामी काळात कोल्हापूर उत्तर प्रमाणे दक्षिण ही शिवसेनेचा बालेकिल्ला करू. दक्षिण आणि उत्तर दोन्ही मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणावे, असे आवाहन केले.   

यावेळी शिवसेना दक्षिण शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उत्तर शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, तुकाराम साळोखे, उदय भोसले, तालुकाप्रमुख बिंदू मोरे, उपशहरप्रमुख सुरेश माने, सचिन भोळे, नामदेव लवटे यांच्यासह भागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.