Nashik News : प्रेम आंधळं असतं... 15 वर्षीय मुलासोबत पळाली 15 वर्षीय मुलाची आई
नाशिक : प्रेम आंधळं असतं... प्रेमात पडलेले लोक वय, जातीपातीचा विचार करीत नसतात, असं म्हटलं जातं. नाशिक शहरातील सिडकोत असाच एक प्रकार घडला आहे.
एक ३६ वर्षीय विवाहित महिला अन् १५ वर्षीय मुलगा चक्क पळून गेले. महिनाभरानंतर दोघेही परतले असले, तरी या घटनेतील गुंतागुंतीने सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याची चर्चा सुरू झाली आहे. अल्पवयीन मुलाला पळवून नेल्याबद्दल कायद्यानुसार महिलेवर मात्र अपहरणाचा गुन्हा दाखल झाला.
संबंधित महिला विवाहित असून, ती पती, पंधरा वर्षीय मुलगा आणि दहा वर्षीय मुलीसह सिडको परिसरात राहते. परिचयातील पंधरा वर्षीय मुलासोबत तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे दोघेही पळून गेले. या काळात ते मुंबईत एका बांधकाम साइटवर राहिले. परंतु, नंतर पैसे संपल्याने, तसेच झालेली चूक लक्षात आल्याने दोघेही नाशिकला परत आले.
मधल्या काळात दोन्ही कुटुंबानी दोघेही बेपत्ता असल्याच्या स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या होत्या. दोघे नाशिकला परतल्यानंतर महिलेच्या पतीने पोलिसांना कळविले.
पोस्को अंतर्गत महिलेवर गुन्हा दाखल होणार का ?
पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. दोघेही स्वमर्जीने घरातून बाहेर पडले असले, तरी मुलगा अज्ञान असल्याने महिलेवर त्याच्या अपहरणाचा प्राथमिक गुन्हा दाखल झाला. परंतु, दोघांच्याही वर्तणुकीमुळे सामाजिक आणि कायदेशीर प्रश्न निर्माण झाले. महिला तर अडचणीत आलीच आहे; मात्र दोन्ही कुटुंबांतील सदस्यही बदनामीच्या भीतीपोटी चिंताक्रांत झाले.आता दोन्ही बाजूंना प्रकरण आपसांत मिटवायचे आहे. परंतु, मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांपुढेही गुन्हा दाखल करण्याशिवाय पर्याय नाही. पोस्को आणि लैंगिक अत्याचाराची कलमे दाखल करायची का, याबाबत मार्गदर्शन घेतले जात आहे. या प्रकारामुळे कामगार वसाहत असलेल्या सिडको परिसरात खळबळ उडाली आहे.