Pahalgam Terror Attack |फडणवीस सरकारचा मोठा निर्णय: हल्ल्यातील कुटुंबांना 'इतक्या' लाखांची आर्थिक मदत

मुंबई : पहलगाम येथे घडलेल्या हृदयद्रावक दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र सरकारने संवेदनशील निर्णय घेत पीडित कुटुंबांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हल्ल्यात मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
शिक्षण आणि रोजगाराची हमी
सरकारने या कुटुंबीयांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यासह, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं आहे. विशेष बाब म्हणजे, या हल्ल्यात बळी पडलेले पुण्याचे संतोष जगदाळे यांच्यावर त्यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यासमोर गोळीबार झाला. त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना राज्य सरकारकडून सरकारी नोकरी देण्यात येणार आहे.
पीडितांची सुरक्षा आणि मानसिक आधार
आसावरी जगदाळे यांनी सरकारचे आभार मानत सुरक्षेचीही मागणी केली आहे. त्या म्हणाल्या, "हल्ल्याच्या धक्क्यातून सावरायला वेळ लागतोय. साधा आवाज झाला तरी भिती वाटते. त्यामुळे काही दिवसांसाठी सरकारने आम्हाला सुरक्षा द्यावी."
महाराष्ट्रातील मृतांची नावे पुढीलप्रमाणे:
-
अतुल मोने – डोंबिवली
-
संजय लेले – डोंबिवली
-
हेमंत जोशी – डोंबिवली
-
संतोष जगदाळे – पुणे
-
कौस्तुभ गणबोटे – पुणे
-
दिलीप देसले – पनवेल
या निर्णयामुळे शोकाकुल कुटुंबांना थोडासा आधार मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. राज्य सरकारच्या या तत्पर आणि संवेदनशील भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे.