Pahalgam Terror Attack | पहलगाम दहशतवादी हल्ला, पाकिस्तानच्या SSG कमांडोचा सहभाग, देशभरात संताप

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्याने देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेने जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेच्या स्थितीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. हल्ल्याचा तपास सुरू असतानाच, या कटात सहभागी असलेल्या एका दहशतवाद्याचे पाकिस्तानच्या लष्कराशी थेट संबंध असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानी लष्कराशी संबंध, SSG कमांडोचं प्रशिक्षण
टाइम्सच्या अहवालानुसार, हल्ल्यात सहभागी असलेला हाशिम मुसा हा पाकिस्तानच्या लष्करातील स्पेशल सर्व्हिस ग्रुपचा (SSG) माजी पॅरा-कमांडो असून, त्याने लष्कर-ए-तैयबासाठी काम सुरू केलं आहे. त्याला जम्मू-काश्मीरमध्ये पाठवण्याआधी विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. मुसाला खास करून पर्यटक, गैर-स्थानिक नागरिक आणि सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याचे आदेश दिले गेले होते, अशी माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.
पहिलेच घातक हल्ल्यांमध्ये सहभाग
हाशिम मुसाचे यापूर्वी झालेल्या गगनगीर आणि बुटा पाथरी हल्ल्यांमध्येही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या वर्षी गगनगीरमध्ये ६ गैर-स्थानिक नागरिक आणि एका डॉक्टरचा, तर बुटा पाथरीमध्ये दोन जवान आणि दोन पोर्टर्सचा मृत्यू झाला होता.
ओव्हरग्राउंड कामगारांकडून ओळख पटली
या प्रकरणातील तपासात १५ ओव्हरग्राउंड वर्कर्सना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून मुसाची ओळख पटली आहे. या OGWs ने दहशतवाद्यांना रसद पुरवल्याचा संशय आहे.
सध्या सरकारकडून अधिकृत वक्तव्य नाही
या घटनेबाबत अद्याप केंद्र सरकार किंवा लष्कराकडून अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. मात्र, या प्रकरणामुळे भारत-पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.