Pune Rape Case : 'त्या' पीडित तरुणीवर आरोपी दत्तात्रय गाडेने केला दोनदा अत्याचार ; तरुणीचा अहवाल पॉझिटीव्ह

पुणे: स्वारगेट एसटी डेपोट २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. या अत्याचार प्रकरणी आता मोठी माहिती समोर येत आहे. वैद्यकीय तपासात या पीडित तरुणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झालं आहे. संध्याकाळी ससुन रुग्णालयाने हा वैद्यकीय अहवाल पोलिसांना दिला आहे. यामध्ये आरोपीने पिडीतेवर एकदा नाही तर दोनवेळा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती देण्यात आली आहे.
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या या भयंकर घटनेने संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा अद्यापही फरार आहे. तर, पीडित तरुणीचा वैद्यकीय अहवालही आता समोर आला आहे.
बसचा वाहक असल्याचं सांगत घेऊन गेला बंद शिवशाहीकडे
स्वारगेटच्या एसटी बस डेपोत ही तरुणी पहाटेच्या सुमारास आली होती. तिला फलटणला जायचं होतं त्यामुळे जिथे सातारची बस लागते ती तिथेच बसलेली होती. मात्र, तेवढ्यात नराधमाची नजर तिच्याकडे गेली आणि तो तिच्याशी बोलायला तिथे गेला. तिला आपल्या बोलण्यात फसवून तो तिला शिवशाहीकडे घेऊन गेला. सातारची बस इथे नाही तर तिकडे लागते असं त्याने पीडितेला सांगितलं. तसेच, तो त्या बसला वाहक असल्याचंही त्याने सांगितलं. त्यामुळे तरुणीचा विश्वास त्याच्यावर बसला आणि ती त्याच्यासोबत बंद शिवशाहीकडे गेली.
असा आहे संपूर्ण घटनाक्रम
त्यानंतर बसमध्ये अंधार पाहून तरुणीला संशय आला पण रात्रीची बस असल्याने प्रवासी झोपले असल्याने दिवे बंद आहेत, असं त्याने सांगितलं. तरुणी बसमध्ये चढताच आरोपीही बसमध्ये चढला आणि आतून दार बंद केलं. त्यानंतर त्याने तरुणीवर अत्याचार केला. कोणाकडे काही वाच्यता केल्यास अथवा आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली. सध्या पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.