योगेश स्पोर्ट्स खडकेवाडा कडून मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

योगेश स्पोर्ट्स खडकेवाडा कडून मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

पत्रकार- सुभाष भोसले

 कै.जयसिंगराव साबळे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव योगेश स्पोर्ट्स चे संस्थापक अध्यक्ष श्री योगेश साबळे यांनी सामाजिक बांधिलकी जपताना अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र शाळा खडकेवडा अंतर्गत येणाऱ्या पंधरा शाळांमध्ये प्रत्येक वर्गातील प्रत्येकी दोन मुलांना अशा एकूण दोनशे मुलांना दर्जेदार शैक्षणिक साहित्याचे वाटप केलं. गेल्या आठ दिवसांपासून प्रत्येक शाळेत जाऊन श्री.योगेश साबळे व योगेश स्पोर्ट्सचे पदाधिकारी, कार्यकर्ते मुलांना शालेय साहित्याचे वाटप करत आहेत. या उपक्रमाचा सांगता समारंभ नुकताच करड्याळ ता. कागल येथे संपन्न झाला. या सांगता समारंभासाठी गटशिक्षणाधिकारी डॉ.गणपती कमळकर प्रमुख उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.प्रियांका पाटील होत्या.  यावेळी बोलताना डॉ. कमळकर यांनी योगेश साबळे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. विशेष म्हणजे प्राथमिक शाळा या गोरगरीब मुलांच्या शाळा आहेत. अशा शाळांसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येणं गरजेचं आहे. अशा शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी शिक्षक,पालक आणि समाज यांनी सामूहिकपणे जबाबदारी पार पाडायला हवी असंही ते म्हणाले. त्यामुळेच योगेश साबळे या शाळांसाठी करत असलेले कार्य निश्चितपणे कौतुकास्पद आहे.

  उपसरपंच कृष्णात कुंभार व ॲड. अरुण पाटील यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी सुरेश गेंगे, ॲड. अरुण पाटील व योगेश साबळे यांनीही मनोगतं व्यक्त केली. स्वागत व प्रास्ताविक विवेक गवळी यांनी तर आभार संजय चिखलीकर यांनी मानले. कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवानंद वाणी, उपसरपंच कृष्णात कुंभार, वैभव साबळे, दत्तात्रय जाधव, सागर जाधव ,व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायतचे सदस्य, योगेश स्पोर्ट्स चे सदस्य, गावातील तरुण मंडळांचे पदाधिकारी, शाळेचा शिक्षक स्टाप,विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.