Solapur Firing : विठ्ठलाचे दर्शन घेऊन आलेल्या पती पत्नीवर झाला गोळीबार; संशयित फरार

Solapur Firing : विठ्ठलाचे दर्शन घेऊन आलेल्या  पती पत्नीवर झाला गोळीबार; संशयित फरार

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात थरारक घटना घडली आहे. पूर्व वैमनस्यातून पती-पत्नीवर गोळीबार करण्यात आल्याचा  धक्कादायक प्रकार  येवती, ता. मोहोळ येथे मंगळवार ता. 8 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता येवती- रोपळे मार्गावर घडला. शिवाजी जाधव आणि सुरेखा जाधव अशी गोळीबारात जखमी झालेल्या पती पत्नीची नावे आहेत. 

दरम्यान त्यांना उपचारासाठी पंढरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून सुरेखा जाधव यांची प्रकृती चिंताजनक आहे. गोळीबाराची घटना घडल्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलीस दल अलर्ट झाले असून घटनास्थळी सर्वच अधिकाऱ्यांनी धाव घेतली.

गोळीबार करून दशरथ केराप्पा गायकवाड हा संशयित फरार झाला आहे. सोलापूर पोलिसांनी संशयित आरोपीच्या शोधासाठी एक अधिकारी व 10 कर्मचाऱ्यांचे पथक रवाना केले आहे. घटना स्थळाला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी भेट देऊन पोलीस निरीक्षक शेंडगे यांना तपासा बाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी अधिक माहिती दिली.

एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते पंढरपूरला

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, शिवाजी जाधव व सुरेखा जाधव हे पती-पत्नी मंगळवारी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. ते दर्शन आटोपून येवतीकडे येत असताना येवती- रोपळे रस्त्यावर ते आले असता दशरथ गायकवाड याने त्या पती-पत्नीवर गोळ्या झाडल्या. त्यात ते दोघेही जखमी झाले आहेत.