Sambhajinagar News : बाईक अन् कारच्या अपघातात १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; कारचालक गंभीर जखमी

Sambhajinagar News : बाईक अन् कारच्या अपघातात १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; कारचालक गंभीर जखमी

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद-फुलंब्री रस्त्यावर भीषण अपघात झाला. एका दुचाकीला भरधाव कारने धडक दिल्याने वाल्मीक देवकर नावाच्या १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा तरुण दूध डेअरीकडून शेताकडे जात असताना मागून आलेल्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात घडला.या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्मीक देवकर हा येसगाव नंबर एक येथील दूध डेअरीवर गेला होता. या दूध डेअरीवरून तो शेताकडे दुचाकी (क्र. एमएच २० डी २९२८) ने जात होता. काही अंतरावर जाताच पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारणे वाल्मीक याच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात दुचाकीचा चुराडा झाला तर कार खड्ड्यात जाऊन पडली. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील वाल्मीक व चार चाकी चालक गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तात्काळ वाल्मीक याला फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र यावेळी डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

वाल्मिकीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तर गंभीर जखमी असलेल्या कारचालकाला छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.