Sindhudurg Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात ;दोन जनांचा जागीच मृत्यू
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. सिंधुदुर्गातील मुंबई-गोवा खारेपाटण येथे महामार्गावर दुचाकी आणि कंटेनर यांच्यात झालेल्या धडकेत राजापूर येथील दोघे तरुण जागीच ठार झाले आहेत. ही घटना काल (बुधवार ११ डिसेंबर) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई - गोवा महामार्गावर घडल्याची माहिती आहे. या घटनेत सचिन एकनाथ लाड (रा. हसोळ राजापूर, वय ३६) हा युवक जागीच ठार झाला. तर त्याच्या सोबत असलेला तानाजी वामन शेळकर (वय ३०, रा. कोडवशी राजापूर शिखरवाडी) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
कंटेनर आणि मोटारसायकलस्वार समोरासमोर धडकले
मिळालेल्या माहितीनुसार, कणकवली पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. हसोळ येथील बाईक स्वार आपल्या ताब्यातील हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल क्रमांक एम एच ०८ एक्स ४२५२ घेऊन खारेपाटण मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवर आला. तेव्हा खारेपाटण बॉक्सवेल ओव्हर फ्लाय ब्रिजवर चुकीच्या साईडने जात असल्याने कणकवलीच्या दिशेने आलेला आणि मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर वाहन क्र. एम एच ४६ सी एल ३१५८ यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मोटार सायकलस्वार सचिन लाड याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत असलेला तानाजी शेळकर हा गंभीर जखमी झाला होता. त्याला १०८ वाहनाने पुढील उपचारासाठी खारेपाटण प्रा. आ. केंद्रात नेण्यात येत होतं. पण त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झालेला होता.
अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक मुंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल देसाई यांनी खारेपाटण येथे अपघात स्थळी तातडीने भेट देऊन अपघाताची माहिती जाणून घेतली. अधिक तपास खारेपाटण पोलीस करत आहेत.