लातूर येथे ४२०० कोंबड्यांचा मृत्यू

लातूर: ढाळेगाव ( ता. अहमदपूर जि. लातूर) येथे ४२०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत.
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे काही दिवसांपूर्वी शेकडो कावळ्यांचा मृत्यू झाला होता. कावळ्यांच्या मृत्यूच्या तपासणीबरोबरच उदगीर येथील रामनगरमध्ये पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूचे निदान झाले आहे. भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेचा याबाबतचा अहवाल प्राप्त झाला आहे.
बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत. येथील एक किलोमीटर परिसरातील मृत पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. अंडी, खाद्यपदार्थ आणि पक्ष्यांचे सर्व अवशेषही नष्ट केले जात आहेत. तसेच या परिसराच्या निर्जंतुकीकरणाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग, वन विभाग, नगरपालिका, पोलीस प्रशासन, जलसंपदा, बांधकाम, भूमि अभिलेख आणि परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत.
याबाबत पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. तसेच आवश्यक उपाययोजना गतीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.