Udhampur : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता उधमपूरमध्ये चकमक ,एक जवान शहीद

Udhampur : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता उधमपूरमध्ये चकमक ,एक जवान शहीद

उधमपूर : दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये चकमकांची मालिका सुरूच आहे. गुरुवारी सकाळी उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. या चकमकीत एक जवान शहीद झाल्याची दुर्दैवी माहिती भारतीय लष्कराने दिली आहे.

गेल्या २४ तासांतील ही सलग तिसरी चकमक आहे. बुधवारी पुलवामा जिल्ह्यात आणि उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्यानंतर सैन्याने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

बसंतगड परिसरात उंचवट्यांवर सुरू चकमक

बसंतगडपासून सुमारे तीन तासांच्या अंतरावर असलेल्या दुडुपसंतगड भागात चकमक सुरू असून, हा प्रदेश दाट जंगल, नैसर्गिक गुहा आणि कठीण भूप्रदेशासाठी ओळखला जातो. याच भागात दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरू केले होते.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

सैन्य आणि पोलिसांचे संयुक्त ऑपरेशन गेल्या दोन दिवसांपासून सुरू असून, सर्च पथके जंगलात पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या भागात उन्हाळ्यात मेंढपाळ गुरे चरायला आणतात, त्यामुळे परिसरात चकमक झाल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.

पहलगाम हल्ल्याचा दहशतवादी हालचालींशी संबंध?

दहशतवादी हालचालींमध्ये अचानक वाढ झाली असून, पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. हे सर्व ऑपरेशन्स त्याच पार्श्वभूमीवर सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.