..... अखेर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नतीं

..... अखेर  जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नतीं

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या शाळांतील २२४ प्राथमिक शिक्षकांना  मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली. अनेक वर्षात प्रथमच मोठ्या संख्येने पदोन्नती झाल्याने जिल्ह्यातील मुख्याध्यापक पदपात्र असलेल्या सर्व शाळांना मुख्याध्यापक मिळाले आहेत.

    मुख्य कार्यकारी कार्तिकेयन अधिकारी एस., उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई व शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सभागृहात समुपदेशनाद्वारे पदोन्नतीची प्रक्रिया झाली. दरम्यान, सध्या कार्यरत असलेल्या ७५ मुख्याध्यापकांनी जिल्हांतर्गत विनंती बदलीसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४० मुख्याध्यापकांनी आज सोयीच्या विनंती बदल्या स्वीकारल्या.

अनेक वर्षापासून पदोन्नती प्रक्रिया करण्याची मागणी शिक्षक संघटना जिल्हा परिषदेकडे करत होत्या. प्रशासनाने ही पदोन्नतीची प्रक्रिया आज पूर्ण केली, जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ४९० प्राथमिक शाळात मुख्याध्यापक पदे मंजूर आहेत. सध्या २६६ मुख्याध्यापक कार्यरत आहेत. २२४ रिक्त पदांसाठी आज ४६० सेवाज्येष्ठ शिक्षकांना समुपदेशनाद्वारे पदोन्नतीसाठी बोलविले होते. ३९९ क्रमांकापर्यंत समुपदेशनाद्वारे जिल्ह्यातील सर्व रिक्त २२४ शाळांची निवड करून शिक्षकांनी मुख्याध्यापक पदे स्वीकारली. यामध्ये पाच दिव्यांग शिक्षकांना प्राधान्याने पदोन्नती दिली.

उपशिक्षणाधिकारी बी. एम. टोणपे, एस. के. यादव, अधीक्षक उदय सरनाईक, रवींद्र ठोकळ, आर. व्ही. कांबळे, विनय कोचरी, सचिन जाधव, सुनील देशमुख, संध्या कांबळे यांनी पदोन्नती व बदली प्रक्रिया सुरळीत पार पाडली.

  जिल्ह्यातील शिक्षक नेत्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार मानले आहेत.