जिल्ह्यातील सर्व शाळांमध्यै "मिशन उत्कर्ष" अभियान राबविणार- सीईओ एस.कार्तिकेयन

जिल्ह्यातील सर्व शाळांमध्यै "मिशन उत्कर्ष" अभियान राबविणार- सीईओ एस.कार्तिकेयन

कोल्हापूर (प्रतिनिधि) : जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद तसेच शासकीय, खाजगी अनुदानित आणि खाजगी विनाअनुदानित सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मिशन उत्कर्ष हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीची विषयनिहाय पडताळणी करून त्यामध्ये वाढ करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शन करणे, PGI व NAS निर्देशांक मधील कामगिरी सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, कोल्हापूर जिल्ह्याच्या PGI गुणांकनामध्ये वाढ करून कोल्हापूर जिल्हा देशामध्ये पहिल्या स्थानावर आणणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत अधिक माहिती देताना कार्तिकएन. एस म्हणाले ..शिक्षण विभाग अंतर्गत दरवर्षी प्रत्येक शाळांची PGI (Performance Grading Index कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक) प्रतवारी निश्चित केली जाते. यामध्ये भौतिक व पायाभूत सुविधा, गुणवत्ता, अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे एकूण सहा श्रेणीनिहाय गुणांकन केले जाते. याकरिता शाळांनी भरलेल्या युडायस माहितीचा आधार घेतला जातो. यामध्ये शाळांमधील विद्यार्थी उपस्थिती, विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर, पर्यवेक्षयीय यंत्रणेच्या शाळा भेटींची संख्या, दिव्यांगासाठी उपलब्ध सुविधा, रेनवॉटर हार्वेस्टींग, विज्ञान प्रयोगशाळा, किचन गार्डन, संगणक व इंटरनेट सुविधा इ. मुद्दयांव्दारे एकूण ८०० गुणांचे मूल्यांकन केले जाते. तसेच अध्ययन निष्पत्ती करिता NAS (National Achievement Survey) परीक्षाव्दारे गुणांकन निश्चित केले जाते.

सन 2021-22 मध्ये करणेत आलेल्या PGI च्या सहा श्रेणीनिहाय प्राप्त गुणांकनानुसार संपूर्ण देशामध्ये पंजाब राज्यातील प्रथम स्थानी बरनाला जिल्हा असून एकूण 468 गुण, द्वितीय स्थानी फैजापूर जिल्हा 457 गुण व तृतीय स्थानी तारण जिल्हा 447 गुण प्राप्त करून आलेले आहेत. तर महाराष्ट्र राज्यात प्रथम स्थानी सातारा जिल्हयास 428 गुण, द्वितीय स्थानी मुंबई जिल्हयास 424 आणि तृतीय स्थानी कोल्हापूर जिल्हयास 422 गुण प्राप्त झाले आहेत. या गुणांकनात कोल्हापूर जिल्ह्यास Learning outcomes यास 290 पैकी 180 दर्जेदार वर्ग करिता 90 पैकी 84 भौतिक सुविधा व विद्यार्थी नोंदणी 51 पैकी 40, विद्यार्थी व शालेय सुरक्षा 35 पैकी 35, डिजिटल लर्निंग 50 पैकी 23 आणि गव्हर्नस प्रोग्रेस 84 पैकी 60 असे एकूण 422 गुण प्राप्त झालेले आहेत. 

देशातील प्रथम क्रमांकाच्या बरनाला जिल्ह्याच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यास 46 गुण कमी असलेने यावर जोमाने काम करणेत येणार आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानी येणेसाठी प्राधान्याने शिक्षण विभाग जिल्हा कोल्हापूर व डायट जिल्हा कोल्हापूर यांच्या प्रयत्नातून मिशन उत्कर्ष हे अभियान नियोजनबद्ध राबविणेत येणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये जिल्ह्याचे गुणांकन कमी आहे, अशा क्षेत्रांवर विशेष लक्ष देणेत येणार आहे. त्या अंतर्गत शाळांमध्ये वार्षिक दिनदर्शिकेव्दारे शैक्षणिक उपक्रम कालबध्दरित्या राबविणेत येणार आहेत. तसेच आवश्यकतेनुसार शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणेत येणार आहे. सर्व शाळांना पर्यवेक्षिय यंत्रणेव्दारे सातत्यपूर्ण मार्गदर्शन करणेत येऊन हे अभियान यशस्वी करणेचा मानस असल्याचे कार्तिकेयन एस. यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडकर, डायट चे प्राचार्य डॉ. राजेंद्र भुई आदी उपस्थित होते.