अखेर फडणवीस सरकारचं ठरलं , 'या' दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार

अखेर फडणवीस सरकारचं ठरलं , 'या' दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार

मुंबई: महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन झाले खरे पण अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. शपथविधी सोहळ्यात काही मंत्र्यांनाही शपथ दिली जाईल अशी शक्यता होती पण फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनीच शपथ घेतली. आता अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. अखेर हा विस्तार 14 डिसेंबर 2024 रोजी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप, शिवसेना, आणि राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांमधील खातेवाटपावर चर्चा यशस्वीपणे पूर्ण झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आपल्याकडे गृह विभाग आणि नगर विकास विभाग यासारखे महत्त्वाचे खाते राखणार आहे. महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग शिवसेनेकडे दिले जाणार असून, अर्थ मंत्रालय मात्र भाजपाकडे राहण्याची शक्यता आहे. महायुतीतील घटक पक्षांना सामावून घेण्यासाठी भाजपने आपल्या कोट्यातील दोन महत्त्वाची खाती देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल आणि गृहनिर्माण विभाग घटक पक्षांना दिले जाणार आहेत. या निर्णयामुळे घटक पक्षांमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते.

भाजप, शिवसेना, आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील खातेवाटप चर्चेचे अंतिम टप्पे पूर्ण झाले असून, सर्व पक्षांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे . मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून राज्यातील प्रशासन अधिक प्रभावीपणे चालवण्याचा प्रयत्न होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नवीन मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे.