अखेर 'या' गावात 12 वर्षांनी बाटली आडवी
नंदुरबार : असलोद गावात 2012 पासून दारूबंदी करा ही मागणी गावकऱ्यांकडून होत होती. यासाठी तब्बल 12 वर्षे आंदोलन चालू होते. अखेर या आंदोलनाला यश आले आहे. प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या मतदानात आडव्या बाटलीचा सुमारे 612 मतांनी विजयी झालाय.
आडवी बाटली, उभी बाटली या चिन्हावर बॅलेट पेपरद्वारे घेण्यात आलेल्या या मतदानात अखेर आडवी बाटली जिंकली. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील ही घटना आहे. मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या शहादा तालुक्यातील असलोद गाव आणि या गावच्या परिसरात गेली अनेक वर्ष वर्षानुवर्षे दारू विक्री सुरू आहे. या गावाजवळच्या मुख्य रस्त्यावर सुद्धा अनेक बिअर शॉपी आणि बिअर बार आहेत. गावातील तरुण पिढीवर दारूमुळे परिणाम होत असल्याने दारूबंदीची मागणी स्थानिक लोकांकडून करण्यात येत होती. गावातील महिलांसह ग्रामस्थांनी अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद होण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. यासाठी 2012 पासून महिलांनी आंदोलन सुरू केलं होतं. याचा वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. परंतु दारूबंदी झालीच नाही.
अखेर प्रशासनाने महिलांच्या मागणीवर मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 8 डिसेंबर रोजी मतदान पार पडले. यात उभी बाटली आडवी बाटली या चिन्हांवर मतदान घेण्यात आले. यावेळी गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. 8 डिसेंबर रोजी सायंकाळी मतदान संपल्यानंतर मतमोजणी घेण्यात आली आणि रात्री जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार या गावात अखेर बाटली आडवी झाली.