अमित ठाकरेंचा पराभव करणाऱ्या आमदाराला उद्धव ठाकरेंनी दिले 'हे' गिफ्ट

मुंबई : माहीम विधानसभा मतदार संघात ठाकरेंच्या शिवसेनेने यश संपादित केले. शिंदे गटाच्या सदा सरवणकर आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा पराभव महेश सावंत यांनी केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जरी शिवसेना ठाकरे गटाची कामगिरी सुमार झाली असली तरी माहीम मतदारसंघात ठाकरे यांच्या उमेदवाराने खुद्द ठाकरेंच्याच पुतण्याचा म्हणजे अमित ठाकरे यांचा पराभव केला आहे. आता या कामगिरीबद्दल उद्धव ठाकरे यांच्याकडून नवनिर्वाचित आमदार महेश सावंत यांना खास गिफ्ट देण्यात आले आहे.
काय मिळालं गिफ्ट ?
मुंबई येथे मातोश्रीवर ठाकरे गटाच्या २० नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला विधानपरिषद आमदार आणि खासदारही उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुतण्या अमित ठाकरे यांचा पराभव करणाऱ्या महेश सावंत यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची अर्धाकृती मूर्ती भेट देऊन सन्मान केला. सावंतांनी मातोश्रीबाहेर येताच माध्यमांना ही भेटवस्तू दाखवली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेचे पाईक असल्याने उद्धव ठाकरेंनी दिलेली ही भेटवस्तू त्यांच्या लेकाला पाडणाऱ्या उमेदवारासाठी असली, तरी नक्कीच त्यांच्यासाठी अभिमानास्पद असेल.
पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी आदित्य ठाकरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी युवा नेते आदित्य ठाकरे यांची सोमवारी निवड करण्यात आली आहे. तर विधानसभा गटनेतेपदाची जबाबदारी ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. विधानसभेतील मुख्य प्रतोद म्हणून दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू यांची निवड करण्यात आली.