हिवाळी अधिवेशनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार, राजकीय वातावरण तापणार

हिवाळी अधिवेशनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार, राजकीय वातावरण तापणार

मुंबई : मुंबईतील तीन दिवसीय विशेष अधिवेशनाला उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. परंतु आता हिवाळी अधिवेशनाला ते हजेरी लावणार आहेत. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १६ डिसेंबरपासून नागपुरात होणार आहे. यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे नागपूरला जाणार आहेत. यावेळी विधिमंडळात राजकीय वातावरण निश्चितच तापणार आहे. या अधिवेशनात ठाकरे कुठले मुद्दे मांडणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.

१५ डिसेंबरला उद्धव ठाकरे विशेष विमानाने नागपूर गाठणार 

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार १६ डिसेंबर ते शनिवार २१ डिसेंबर या कालावधीत नागपुरात पार पडणार आहे. त्यासाठी रविवार १५ डिसेंबरला उद्धव ठाकरे विशेष विमानाने नागपूर गाठतील. पहिल्या दिवसापासूनच ठाकरे अॅक्शन मोडमध्ये दिसतील. १६ आणि १७ तारखेला ते कामकाजात सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

विरोधीपक्ष नेतेपदाचा निर्णय काय?

विशेष म्हणजे, संख्याबळाअभावी विधानसभा विरोधीपक्ष नेतेपद रिक्त राहण्याची चिन्हं आहेत. मात्र अध्यक्षांनी त्यास मान्यता दिली, तर विरोधीपक्ष नेता निवडीसाठी महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे प्रत्यक्ष सहभागी होताना दिसतील. नियमानुसार महाराष्ट्र विधानसभा नियमात ज्या तरतुदी असतील, तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या प्रथा-परंपरेच्या अनुषंगाने मी योग्य तो निर्णय घेणार आहे, असं सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधीपक्ष नेत्याबाबत सस्पेन्स कायम ठेवला होता.