मेरठमध्ये शिव महापुरान कथा सोहळ्यात चेंगराचेंगरी; चार महिला जखमी

मेरठमध्ये  शिव महापुरान कथा सोहळ्यात चेंगराचेंगरी; चार महिला जखमी

लखनऊ: मेरठ (उत्तर प्रदेश) येथील शताब्दीनगरात आयोजित केलेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुरान कथा सोहळ्यात आज दुपारी झालेल्या चेंगराचेंगरीत चार महिलांसह अनेकजण जखमी झाले असून काहीजण दबले गेले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. या कार्यक्रमासाठी  जवळपास सव्वालाख भाविक आले होते. 

पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथा वाचन सोहळ्याचा आजचा सहावा दिवस आहे. उद्या या सोहळ्याची सांगता आहे. कथावाचन सोहळ्याला महिला आणि वृद्धांची संख्या मोठी होती. त्यांना बाऊंसर्सनी प्रवेशद्वाराजवळ रोखलं. त्यानंतर गर्दीत धक्काबुक्की सुरु झाली. भाविक एकमेकांवर पडले. त्यामुळे अनेक जण दबले गेले. जखमींवर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.श्री केदारेश्वर सेवा समितीकडून शिवमहापुराण कथा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कथा वाचनाची वेळ दुपारी १ ते ४ होती. गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेल्या कार्यक्रमात कथा ऐकण्यासाठी लाखो भाविक आले होते. आयोजकांनी वाहनं उभी करण्यासाठी ७ पार्किंग तयार केली आहेत. कार्यक्रमस्थळी १ हजार पोलीस कर्मचारी तैनात आहेत.

मुख्य प्रवेशद्वाराजवळच चेंगराचेंगरी झाली. महिला एकमेकांच्यावर पडल्या. त्यात चार महिला जखमी झाल्या. आयोजनात झालेल्या चुकांमुळे हा प्रकार घडल्याची माहिती आहे. दुर्घटनेतील जखमींचा नेमका आकडा समजू शकलेला नाही.