कळंबा येथे मोठी कारवाई ; गर्भपात करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
![कळंबा येथे मोठी कारवाई ; गर्भपात करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश](https://majhamaharashtra.in/uploads/images/202502/image_750x_67adacb8306b7.jpg)
कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यामध्ये गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट झाला असून यामध्ये डॉक्टरांचा सुद्धा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोल्हापूर शहराच्या वेशीवर असलेल्या कळंब्यामध्ये मोठी कारवाई करण्यात आली असून गर्भपात करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला.
या कारवाईमध्ये डॉक्टर दिपाली सुभाष ताईंगडे (वय 46 रा. कळंबा साईमंदिरसमोर, कोल्हापूर) हिला ताब्यात घेण्यात आलं आहे. सुप्रिया संतोष माने (वय 42, रा. रायगड काॅलनी, कळंबा) आणि धनश्री अरुण भोसले (वय 30, रा. शिंगणापूर) यांनाही अटक करण्याता आली आहे. पथकाकडून रोख रकमेसह गर्भपाताच्या गोळ्यांचे पाच किट जप्त करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कळंब्यामधील साई मंदिर जवळील श्रद्धा दवाखान्यामध्ये गर्भ गर्भलिंग निदान केले जात असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आरोग्य विभागाकडे करण्यात आली होती. करवीर तालुका जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने परिसरात सापळा लावत एका महिलेला डॉक्टर दिपालीकडे पाठवले होते.
गर्भलिंग निदान करून सर्वप्रथम गोळ्या देण्यासाठी रक्कम ठरवण्यात आली होती. दिपालीने डमी महिलेला गर्भपाताच्या गोळ्या देत गर्भलिंग तपासण्यासाठी एक व्यक्ती येईल, अशी माहिती दिली. यानंतर अवैध प्रकार सुरु असल्याचे कळताच छापा टाकून कारवाई करण्यात आली. गर्भपाताची तीन पाकिटे जप्त करण्यात आली. झाडाझडतीनंतर रुग्णालय सील करण्यात आले.