कसं राबवलं Operation Sindoor... कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिली माहिती

कसं राबवलं  Operation Sindoor... कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिली माहिती

नवी दिल्ली :  22 एप्रिल रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये  26 निष्पाप पर्यटकांचे प्राण दहशतवाद्यांनी एका भ्याड हल्ल्यात घेतले. देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच, अखेर भारतानं आज (बुधवार) पाकिस्तानला Operation Sindoor राबवत सडेतोड प्रत्युत्तर  दिलं आहे.

भारतीय वायुदलाने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करत “ऑपरेशन सिंदूर” या विशेष मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली. या मोहिमेची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं की, पहलगाममधील हल्ला हा जम्मू-कश्मीरमध्ये सुरू असलेल्या पर्यटन विकासाला धक्का देण्यासाठी होता. “राज्य पुन्हा एकदा मागे जावं, तेथील शांती व स्थैर्य बिघडावं, हाच या हल्ल्यामागचा हेतू होता,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

कर्नल सोफिया कुरेशी काय म्हणाल्या ? 

ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत माहिती देताना कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, “हा हल्ला केवळ बदला घेण्यासाठी नव्हता, तर न्याय मिळवण्यासाठी होता.”

भारतीय वायुदलाने आणि लष्कराने मिळून एकूण 9 दहशतवादी अड्ड्यांवर अचूक हल्ला केला. यामध्ये पीओकेतील कोटली अब्बासमधील तळ, पाकिस्तानी पंजाबमधील बहावलपूर, महमूना झोया तसेच अजमल कसाबला प्रशिक्षण देण्यात आलेले मुरीदके येथील मरकज तैयबा हे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.

“या मोहिमेदरम्यान आम्ही विशेष खबरदारी घेतली की, एकाही सामान्य नागरिकाचा जीव जाऊ नये,” असं सांगतानाच त्यांनी दहशतवाद्यांच्या छावण्यांचे उपग्रह चित्रेही पत्रकार परिषदेत दाखवली.

काय म्हणाल्या विंग कमांडर व्योमिका सिंग ?

या मोहिमेची माहिती देताना विंग कमांडर व्योमिका सिंग म्हणाल्या, “आमचा उद्देश स्पष्ट होता . दहशतवाद्यांना त्यांच्याच अड्ड्यांवर ठार मारणे आणि जगाला दाखवणे की भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही मर्यादा ओलांडायला तयार आहे.”

दोन महिला अधिकाऱ्यांनी केले मोहिमेचे नेतृत्व 

या एअर स्ट्राईक मोहिमेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे याचे नेतृत्व दोन महिला अधिकाऱ्यांनी केले. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला अधिकारी या मोहिमेचं नेतृत्व करत असून भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा संवेदनशील मोहिमेची जबाबदारी महिलांच्या हाती देण्यात आली आणि तेवढ्याच दृढतेने त्यांनी संपूर्ण देशवासियांच्या वतीने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले.