कावळा नाका पार्किंगमध्ये ट्रॅव्हल्स स्थलांतराची तयारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) - शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलण्यात येत असून, कावळा नाका येथील छत्रपती ताराराणी मार्केट परिसरातील पार्किंगमध्ये शहरातील सर्व खाजगी ट्रॅव्हल्स पार्क करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने आज प्रशासक के.मंजूलक्ष्मी आणि पोलीस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी संयुक्त पाहणी केली.
शहरात दररोज सायंकाळी मध्यवर्ती बस स्थानक परिसरात खाजगी ट्रॅव्हल्समुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. ही समस्या सोडवण्यासाठी ट्रॅव्हल्सना कावळा नाका येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. या पाहणी दरम्यान प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी पार्किंगमधील डबरेज तातडीने हटवण्याच्या सूचना दिल्या तसेच आजपासून काही ट्रॅव्हल्सची ट्रायल घेण्याचे निर्देश दिले. या निर्णयाला ट्रॅव्हल्स असोसिएशनने सहकार्य दर्शवले असून, लक्झरी बसेससाठी या पार्किंगची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय, ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या मागणीनुसार पार्किंगच्या मागील भिंतीची उंची वाढवण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.
शिवाजी पार्क पाण्याच्या टाकीचे काम सुरु करण्याचे आदेश -
प्रशासक के.मंजूलक्ष्मी आणि पोलीस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी शिवाजी पार्क येथे अमृत 1 अंतर्गत सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीच्या कामाची पाहणी केली. स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे हे काम ठप्प झाले होते. यावर तात्काळ उपाययोजना करत ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश दिले. आवश्यकता भासल्यास पोलीस बंदोबस्त पुरवण्याच्या सूचनाही पोलीस अधिक्षकांनी दिल्या.
इराणी खणी स्वच्छता आणि गणेशोत्सव तयारीचा आढावा -
गणेशोत्सव 2025 च्या पार्श्वभूमीवर इराणी खणीची स्वच्छता महापालिकेच्या वतीने करण्यात आली असून, या ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासक मंजूलक्ष्मी यांनी दिले. यात वॉच टॉवर, सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे आणि विसर्जन मार्गांचे नियोजन करणे यांचा समावेश आहे.
या पाहणीत अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, उपायुक्त कपिल जगताप, परितोष कंकाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, उपशहर अभियंता महादेव फुलारी, निवास पोवार उपस्थित होते.