प्रशासनाचा मोठा निर्णय; जिल्ह्यातील रेशन कार्ड टप्याटप्याने बंद होणार
कोल्हापूर / प्रतिनिधी :
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता कोल्हापूर जिल्ह्यातही पारंपारिक रेशन कार्ड टप्याटप्याने बंद करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. त्यामुळे कोल्हापुरात आता ई-रेशन कार्ड वापरात येणार आहे.
जिल्ह्यात याची सुरुवात झाली असून, कोल्हापूर शहर अन्नधान्य वितरण कार्यालयातून आतापर्यंत तीन ई-रेशन कार्ड लाभार्थ्यांना देण्यात आली आहेत. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयानुसार आता क्यूआर कोड असलेले रेशन कार्ड नागरिकांना देण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करणे, पत्ता बदलणे, नावातील दुरुस्ती तसेच नवीन नाव समाविष्ट करणे, वगळणे ही कामे आता घरबसल्या करता येणार आहे. डीजी लॉकर्समध्येही हे ई-रेशन कार्ड दिसणार आहे. मेल, मोबाईल फोनद्वारेही पीडीएफ, फोटो स्वरूपात हे ई-रेशन कार्ड हव्या त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात संबंधित व्यक्तीला रेशन कार्ड खेरीज कोणत्याही रेशन दुकानात आपले धान्य घेणे शक्य होणार आहे.