२० गुंठेवाले कामगारपुत्र आबिटकर १० वर्षांत हजारो एकरांचे धनी कसे झाले? - के पी पाटील
गारगोटी (प्रतिनिधी) : आमची पिढीजात आणि स्वकमाईची संपत्ती किती आहे हे जगजाहीर आहे; परंतु बिद्री साखर कारखान्याच्या सर्वसामान्य कामगाराचे पुत्र असलेल्या व १० वर्षांपूर्वी केवळ २० गुंठ्यांचा सातबारा असलेल्या आमदार आबिटकरांकडे हजारो एकर जमीन आली कुठून? असा थेट सवाल माजी आमदार के पी पाटील यांनी केला. या निवडणुकीच्या निमित्ताने जनतेला त्यांनी आपल्या या अमाप संपत्तीचे रहस्य कुलदेवतेची शपथ घेवून सांगावे असा जोरदार प्रहारही श्री पाटील यांनी आबिटकरांवर केला.
पुष्पनगर येथील प्रचार सभेत ते बोलत होते.
पाटील पुढे म्हणाले,"पहिल्या निवडणुकीत लोकांनी वर्गणी काढून निवडून दिले असे सांगणारे प्रकाश आबिटकर आता त्याच लोकांना पैशाचे आमिष दाखवून मतदारांची थट्टा करीत आहेत. परंतु राधानगरीची जनता स्वाभिमानी असून तुमच्या या आमिषाला बळी न पडता हे बुमरँग तुमच्यावरच उलटविल्याशिवाय राहणार नाही. आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या नावावर जेथे मिळतील तेथे जमिनी घेणाऱ्या आमदार आबिटकरांनी दहा वर्षे समाजसेवेचा नकली बुरखा घातला होता; परंतु तो आता फाटला असून त्यांचा खरा भ्रष्टाचारी चेहरा या निवडणुकीत समोर आला आहे."
रणजीत बागल म्हणाले," तुम्हाला निवडून देवून चूक केल्याचे जनतेच्या लक्षात आल्याने यावेळी ती चूक दुरुस्त करण्यासाठी मतदार २० तारखेची वाट पाहात आहेत. जनतेच्या पवित्र मतांची किंमत तुम्ही ५० खोके केल्याने तुमच्या गद्दार वृत्तीचा जनता पोलखोल करेल."
यावेळी राहुल देसाई,आर बी देसाई,विश्वनाथ कुंभार,शामराव देसाई आदींची भाषणे झाली. सचिन घोरपडे,के ना पाटील, सुरेश नाईक, प्रकाश पाटील, दयानंद भोईटे, डी एस देसाई, अविनाश शिंदे, प्रसाद पिलारे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेंद्र देसाई यांनी आभार मानले. सवेपूर्वी सोनारवाडी, सालपेवाडी,मडूर,राणेवाडी, मांढरेवाडी,गडबिद्री,हेळेवाडी, लहान बारवे आदी गावांचा प्रचार दौरा झाला.
*कोटींची उड्डाणे... आदाणींशी स्पर्धा !*
आमदार आबिटकर आता हलक्यातले काय बोलतच नाहीत. त्यांचे सगळे आकडे कोटीत असतात. जागेपणी आणि झोपल्यावरही त्यांच्या तोंडी कोटीचीच भाषा असते. आमदार झाल्यापासून गेल्या दहा वर्षांत त्यांची कोटींची उड्डाणे सुरू असून श्रीमंतांच्या यादीत नाव झळकण्यासाठी त्यांची थेट उद्योगपती गौतम अदाणींशी स्पर्धा सुरू असल्याची आता आर्थिक वर्तुळात चर्चा सुरु असल्याचे के पी पाटील म्हणताच उपस्थितांनी शिट्ट्या व टाळ्यांचा कडकडाट करीत प्रतिसाद दिला.