विधानभवनात राडा ; राज ठाकरेंनी दिला सरकारला 'हा' इशारा

मुंबई - राज्यातील अनेक गंभीर मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित असलेल्या विधिमंडळाच्या परिसरात गुरुवारी चांगलाच गोंधळ उडाला. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात सुरू असलेला वाद चिघळला असल्यामुळे दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाली. या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त करत सरकारवर थेट निशाणा साधला. “जर तुमच्यात साधनशुचिता शिल्लक असेल, तर तुमच्या स्वतः च्या आमदारांवर कारवाई करा. अन्यथा, आमचे कार्यकर्ते उत्तर देतील, आणि नंतर आम्हाला दोष देऊ नका,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
राज ठाकरे म्हणाले, “काल विधानभवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली मारहाण पाहून मला प्रश्न पडतो, महाराष्ट्राची अवस्था इतकी वाईट कशी झाली? सत्ता ही साधन असायला हवी, साध्य नव्हे. जेव्हा हा भान हरवतो, तेव्हा वादग्रस्त आणि मराठी द्वेष्टे लोक पक्षात घेतले जातात आणि त्यांच्याकडून इतर ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ टीका केली जाते. हे नाटक आता जनतेच्या लक्षात आलं पाहिजे.”
मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरे म्हणाले, “जर आमचे महाराष्ट्र सैनिक मराठी माणसाच्या अपमानाविरोधात पाऊल उचलतात, तर त्यांच्यावर कारवाई होते. मात्र, आज जे सत्ताधारी आमदार मराठी माणसावर शाब्दिक हल्ला करतात, त्यांच्याविरोधात कोणीच का बोलत नाही? मराठीसाठी उठलेली ही आग ही केवळ व्यक्तिगत वैरातून नसते, ती भाषेच्या अभिमानातून असते.”
अधिवेशनातील गोंधळावर संताप व्यक्त करताना राज ठाकरे यांनी या सत्राच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “अधिवेशनाचा प्रत्येक दिवस दीड ते दोन कोटी रुपये खर्चिक असतो. हे पैसे व्यक्तिगत वादांसाठी वाया घालवले जात आहेत का? राज्यात कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना निधी मिळत नाही, पण इथे चिखलफेक आणि धक्काबुक्की सुरू आहे. जर आज यांना माफ केलं, तर उद्या विधानभवनात हत्याही घडू शकतात,” अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.