कृष्णराज महाडिक यांच्याकडून जंगल मोहीम यशस्वीपणे संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधि) : तरूण पिढीमध्ये साहसी वृत्ती निर्माण व्हावी, निसर्गाबद्दल ओढ वाढावी आणि आरोग्य संवर्धन व्हावे, या उद्देशाने युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी पुढाकार घेवून, केएम ऍडव्हेंचर ट्रेक आयोजित केला होता. त्यामध्ये कोल्हापूरसह पुणे, मुंबई, नाशिक, संभाजीनगर, नागपूर मधून आलेले सुमारे १ हजार पेक्षा अधिक तरूण- तरूणी सहभागी झाले होते. कोल्हापूर जिल्हयातील खेडगे इथं झालेला हा ट्रेक संस्मरणीय ठरल्याचे अनेकांनी सांगितले.
युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी पुढाकार घेवून, भुदरगड तालुक्यातील खेडगे परिसरात केएम ऍडव्हेंचर ट्रेकचं आयोजन केले होते. कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या सुमारे १ हजार तरूण- तरूणींनी रविवारच्या ट्रेक मध्ये सहभाग नोंदवला. रविवारी पहाटे सहा वाजता तरूणाईने खेडगे गावाकडं प्रयाण केले. सुमारे ८ किलोमीटर चालण्याच्या या ट्रेकमधून निसर्गाशी जवळीक साधण्यात आली. एका धबधब्याचे दर्शन घेवून, दुपारी सुमारे १ हजार तरूणांची जंगलातच जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच काही स्पॉट गेम घेण्यात आले. कृष्णराज महाडिक यांनी, ट्रेक मधील सर्व सहभागी तरूणांशी आपुलकीने संवाद साधत, कोल्हापूर जिल्हयाच्या निसर्ग संपदेविषयी आणि इतिहासाबद्दल माहिती दिली. एक दिवसाच्या या ट्रेक मध्ये धनंजय महाडिक युवाशक्तीचे कार्यकर्ते, भाजपाचे भुदरगड तालुक्यातील पदाधिकारी सुध्दा सहभागी झाले होते. या ट्रेकमधून एक संस्मरणीय अनुभव मिळाला, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.