कोल्हापुरात खुल्या छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर (प्रतिनिधि) : १९ ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशन आणि कोल्हापूर क्रिएटर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं खुल्या छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी हेरिटेज कोल्हापूर आणि निसर्ग असे दोन विषय ठेवले आहेत. स्पर्धेतील सहभागी चित्रांचे प्रदर्शन १७ ते १९ ऑगस्ट या काळात शाहू स्मारक भवनमध्ये भरवण्यात येणार आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापुर जिल्हयातील हौशी आणि व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी खुली असलेली ही स्पर्धा दोन गटात होणार आहे. त्यामध्ये पहिल्या विभागात कॅमेराद्वारे काढलेले (डी एस एलआर अथवा मिररलेस कॅमेरा) १२ बाय १८ इंचाची प्रिंट आणि १६ बाय २२ इंच माऊंट (ऑफव्हाईट) अशा प्रकारचे छायाचित्र तर दुसर्या गटात मोबाईलद्वारे काढलेेले ८ बाय १२ इंच आणि १२ बाय १६ इंच माऊंट (ऑफव्हाईट) अशा गटात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी छायाचित्र प्रिंट आणि माऊंट स्पर्धकांनी स्वतः करून आणायचे आहे. स्पर्धेला कोणतेही प्रवेश शुल्क नाही. छायाचित्राच्या माऊंटच्या मागे स्पर्धकाचे नाव, मोबाईल नंबर आणि कॅमेरा किंवा मोबाईलचा मॉडेल नंबर टाकायचा आहे. छायाचित्रावर पुढील बाजूस स्पर्धकाचे नाव किंवा वॉटरमार्क असेल तर अशी कलाकृती स्पर्धेत ग्राहय धरली जाणार नाही. दिलेल्या विषयानुरूप छायाचित्रांचेच परिक्षण केले जाईल. निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. छायाचित्रे जमा करण्याची अंतिम मुदत १० ऑगस्टपर्यंत आहे. स्पर्धेसाठी आलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन १७ ते १९ ऑगस्ट या दरम्यान राजर्षि शाहू स्मारक भवनमध्ये होणार आहे. १७ ऑगस्टला छायाचित्र प्रदर्शनाचा शुभारंभ होईल. त्याचवेळी दोन्ही गटातील विजेत्यांची नावे जाहीर केली जातील. आणि १९ ऑगस्टला स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा होईल. कॅमेरा विभागासाठी प्रथम क्रमांक ५ हजार १ रूपये, ट्रॉफी आणि सन्मानपत्र, द्वितीय क्रमांक ३ हजार १ रूपये, तृतीय क्रमांक २ हजार १ रूपये आणि उत्तेजनार्थ दोन विजेत्यांना प्रत्येकी १ हजार १ रूपये तसंच ट्रॉफी आणि सन्मानपत्र दिले जाणार आहे. तर मोबाईल विभागासाठी अनुक्रमे ३ हजार १, २ हजार १ आणि १ हजार १ तसंच उत्तेजनार्थ ५०१ रूपयांची दोन बक्षिसे ट्रॉफी आणि सन्मानपत्र दिले जाणार आहे. स्पर्धकांनी १० ऑगस्टपर्यंत आपले छायाचित्र मंगळवार पेठेतील दैवज्ञ बोर्डींग समोरील सर्व्हेश फोटोग्राफीक्समध्ये मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्समधील बालाजी फोटोस्टुडीओ, राजारामपुरी सहाव्या गल्लीतील उत्सव फोटोस्टुडओ, कळंब्यातील अरिहंत फोटोस्टुडिओ, शाहूपुरी चौथ्या गल्लीतील हर्ष ग्राफीक्स अॅन्ड व्हिडीओज या ठिकाणी छायाचित्र जमा करायचे आहे, असे अरूंधती महाडिक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सर्वेश देवरूखकर, किशोर पालोजी आणि विनोद चव्हाण उपस्थित होते