गुणवंत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी शाहू साखर कारखान्याचे भूषण - सुहासिनीदेवी घाटगे

कागल (प्रतिनिधी) - शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या संकल्पनेतून उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजना सुरू आहे. यातील अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. असे गुणवंत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी शाहू साखर कारखान्याचे भूषण आहेत असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले.
शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ या वर्षातील शैक्षणिक शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रमवेळी त्या बोलत होत्या.यावेळी २९४ विद्यार्थ्यांना ९ लाख ५१ हजार रुपये शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वाटप केले.
सुहासिनीदेवी घाटगे पुढे म्हणाल्या, कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी शेतकरी,कर्मचारी केंद्रबिंदू ठेवूनच धोरणे राबविली.त्याचबरोबर त्यांच्या परिवाराचाही सर्वांगीण विकास झाला पाहिजे.हा त्यांच्या कामकाजाचा दृष्टिकोन होता.त्यांनी सुरु केलेल्या या योजनेचा आजअखेर ५६१४ मुलांना लाभ झाला आहे.या योजनेतून १कोटी ७१ लाख ३० हजार शैक्षणिक शिष्यवृत्ती रकमेचे वितरण केले आहे.ग्रामीण भागातील मुलांना शहरातील दर्जाच्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात.यासाठी त्यांनी कारखाना शिक्षण संकुल, वसतिगृह काढले. त्यांच्या पश्चात राजे समरजितसिंह घाटगे व नवोदिता घाटगे यांनी त्यामध्ये भर घालून यशश्री इंग्लीश मेडियम स्कुल,स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र, राजे विक्रमसिंह घाटगे अकॅडमीसुद्धा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी या उद्देशाने सुरू केली आहे. शाळांना ई लर्निंग संच पुरविण्यात येत आहेत याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे.
फायनान्स मॅनेजर आर .एस. पाटील यांनी स्वागत केले.उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी आभार मानले.
यावेळी संचालक युवराज पाटील,सचिन मगदूम,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
शिष्यवृत्ती योजनेस वाढता प्रतिसाद -
शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तेत मुलांच्या तुलनेत मुली आघाडीवर आहेत.त्यांना प्रोत्साहन म्हणून शाहू साखर कारखान्यामार्फत संस्थापक राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या संकल्पनेतून मुलांच्या तुलनेत जादा शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. या योजनेत यावर्षी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला आहे.हे कौतुकास्पद आहे. या विद्यार्थ्यांनी उज्वल भविष्यासाठी चांगली कामगिरी करावी अशा शुभेच्छा यावेळी घाटगे यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.