छ.शाहू महाराजांचा शैक्षणिक वारसा कृतीतून चालविणा-या शिक्षकांना प्रोत्साहन देणे हा माझा राजधर्मच- समरजितसिंह घाटगे

छ.शाहू महाराजांचा शैक्षणिक वारसा कृतीतून चालविणा-या शिक्षकांना प्रोत्साहन देणे हा माझा राजधर्मच- समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानमध्ये शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारी कार्य केले.हाच वारसा शिक्षक कृतीतून चालवित आहेत.अशा शिक्षकांना प्रोत्साहन देणे हा माझा राजधर्मच आहे.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे  यांनी केले.

 येथे राजे फाऊंडेशन व जिजाऊ महिला समिती यांच्यावतीने सन २०२४या वर्षातील 'स्व.राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार' वितरण सोहळ्यावेळी ते बोलत होते.

  अध्यक्षस्थानी शाहू  कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे होत्या.  यावेळी जीवन गौरव,आदर्श मुख्याध्यापक, प्राथमिक,माध्यमिक शिक्षक - शिक्षकेत्तर, आशा स्वयंसेविका,अंगणवाडीसेविकांसह महिला बचत गटांना या पुरस्काराने सन्मानित केले.

 ते पुढे म्हणाले, गेली पंचवीस वर्षे सत्ता असूनही शाळांमध्ये भौतिक सुविधा नाहीत. इमारतींची दुरावस्था झाली आहे. पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत. तर अनेक ठिकाणी शिक्षकांची संख्याही अपुरी आहे.प्राथमिक शाळा संगणकीकृतही झालेल्या नाहीत. 25 वर्षाच्या सत्तेनतंरचे हे चित्र दुर्दैवी आहे. रस्ते गटरच्या कामावर हजारो कोटी रुपयांच्या केलेल्या खर्चापैकी काही निधी या ठिकाणी देता आला नसता का? याऊलट आम्ही गेल्या पाच वर्षाच्या कालावधी दीडशे शाळांमध्ये ई लर्निंग संच दिले. नवीन वर्गखोल्या बांधण्यासह जुन्यांच्या दुरुस्तीसाठी तसेच स्वच्छतागृह यासाठी प्राधान्याने निधी दिला. विरोधक व आमच्या कामाच्या पद्धतीतील हा फरक आता बघण्याची वेळ आली आहे. 

राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा  नवोदिता घाटगे म्हणाल्या, स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे  साहेब नेहमी म्हणत असत की शिक्षक केवळ विद्यार्थीच नाही तर समाजही घडवितात. मात्र ग्रामीण भागात अपुऱ्या  सोयी सुविधा असल्यामुळे या भागातील शिक्षकांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचेही ते नेहमी सांगत. त्यांच्याच या शिकवणीनुसार आदर्श शिक्षक पुरस्कारासह विविध शैक्षणिक कार्यातून समरजितसिंह  घाटगे यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवले जात आहेत.

यावेळी  सारिका कासोटे बाळासाहेब निंबाळकर सुनील पाटील राजाराम सावर्डेकर बाळनाथ डवरी किशोर जाधव प्रभाकर कमळकर नामदेव चौगुले नेताजी कमळकर   मारुती देसाई बाबुराव पाटील यांचा विविध ठिकाणी निवडी झाल्याबद्दल सत्कार केला

 यावेळी यशोदा देशमुख,जनार्दन निऊंगरे, रमेश पाटील,अतुल कुंभार यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे सर्व संचालक,माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी,राजे  बँकेचे चेअरमन एम.पी.पाटील,प्रकाश मगदूम, सुरेश सोनगेकर, भिमराव कोगले संदीप पाटीलआदींची प्रमुख उपस्थिती होती.  रमेश कांबळे यांनी स्वागत केले.एल.डी.पाटील यांनी आभार मानले.

आशा व अंगणवाडी सेविकांच्या कामाचा अभिमान

 आशा व अंगणवाडी सेविका शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनाचा विचार न करता ग्रामीण भागामध्ये आरोग्यसह शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मोठे योगदान देतात. हे काम त्या नोकरी म्हणून न करता आपुलकीने कर्तव्य म्हणून वैयक्तिक सुख-दुःखे बाजूला ठेवून प्रामाणिकपणे करतात.त्यामुळे त्यांच्या या कार्याचा छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वंशज म्हणून मला प्रचंड अभिमान आहे.त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी  पाठपुरावा करू.अशी ग्वाही घाटगे यांनी यावेळी दिली.