Pahalgam Terror Attack : गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा घ्या; संजय राऊत यांची मोदींकडे मागणी

Pahalgam Terror Attack : गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा घ्या; संजय राऊत यांची मोदींकडे मागणी

मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे २६ नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून राजकारण तापलं आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर थेट टीका करत गृह मंत्री अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

राऊत म्हणाले, “काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी गृहखात्यावर आहे. जर आमचा मंत्री असता, तर त्याचा राजीनामा मागितला असता. मग अमित शहांचाही राजीनामा का नाही? सरकारच्या गाफिलपणामुळे हा मानवी संहार झाला आहे.”

त्यांनी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करत सांगितलं की, “सर्वपक्षीय बैठक हा केवळ औपचारिकपणा आहे. दोन दिवसांचं विशेष अधिवेशन घेऊन या हल्ल्याबाबत चर्चा झाली पाहिजे.”

पुलवामा हल्ल्याचाही उल्लेख करत, राऊत म्हणाले, “त्यावेळी ४० जवान मारले गेले, तरी कारवाई झाली नाही. आता जे प्रश्न विचारतो, त्याला देशद्रोही ठरवलं जातं.” सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख करत त्यांनी केंद्रावर व्यंगात्मक टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका करत, “काश्मीरमधील हल्ल्यानंतर देखील त्यांनी बिहारमधील प्रचार सभा रद्द केली नाही, तर राहुल गांधी अमेरिकेतून परत येऊन काश्मीरला गेले,” असंही राऊत यांनी नमूद केलं.