‘जाट’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात ; रणदीप हुड्डा , सनी देओल विरोधात गुन्हा दाखल

मुंबई :सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांचा ‘जाट’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळवत आहे. पहिल्या दिवशी ९.५ कोटी रुपयांची दमदार ओपनिंग घेतलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत ६१.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र, याच यशाच्या पार्श्वभूमीवर आता हा चित्रपट एका वादात अडकला आहे.
जालंधरमधील पोलिस ठाण्यात चित्रपटाच्या एका दृश्यामुळे अभिनेता रणदीप हुड्डा, सनी देओल, विनीत कुमार, दिग्दर्शक गोपी चंद आणि निर्माते नवीन मालीनेनी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली कारवाई करण्यात आली आहे.
एफआयआरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, रणदीप हुड्डा यांनी चित्रपटातील एका दृश्यात येशू ख्रिस्त आणि ख्रिश्चन धर्माच्या प्रतीकांचा अवमान केला आहे. यामुळे ख्रिश्चन समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून, चित्रपटाच्या टीमवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी निष्पक्ष तपासाचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, ‘जाट’च्या यशानंतर अभिनेता सनी देओलने ‘जाट २’ ची घोषणा केली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मात्र आता, अक्षय कुमारचा ‘केसरी चॅप्टर २’ थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यामुळे ‘जाट’च्या कलेक्शनवर परिणाम होण्याची शक्यता आहे. १०० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाला यशासाठी अजूनही जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत.