'क्योंकि सास भी कभी बहू थी २: स्मृति इराणी दिसणार पुन्हा तुलसीच्या भूमिकेत ?

'क्योंकि सास भी कभी बहू थी २: स्मृति इराणी दिसणार पुन्हा तुलसीच्या भूमिकेत ?

मुंबई: 'रिश्तों के भी रूप बदलते है...' हे वाक्य कानांवर पडलं, की लगेच स्मृती इराणी यांच्या 'क्यूं की सास भी कभी बहू थी'ची आठवण येते. छोट्या पडद्यावरच्या गाजलेल्या मालिकांपैकी ही एक मालिका. मालिकेत तुलसी ही व्यक्तीरेखा अभिनेत्री स्मृती इराणी यांनी साकारली होती. या मालिकेनं स्मृती इराणी यांचं आयुष्यच बदललं. तब्बल आठ वर्षे ही मालिका सुरू होती. टॉप टीआरपीचा रेकॉर्डही या मालिकेनं मोडला होता. आता काही महिन्यांपासून या मालिकेचा दुसरा सीझन येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर आता नवीन अपडेट आल्याची माहिती आहे. निर्मात्यांकडून या चर्चेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

काही रिपोर्ट्सनुसार 'क्यूं की सास भी कभी बहू थी' मालिकेच्या दुसऱ्या भागाचं काम सुरू झालं आहे. इतकंच नाही तर या दुसऱ्या सीझनमध्ये १५० एपिसोड असतील, प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यात वाढ होऊ शकते, असं म्हटलं जात आहे. पहिल्या सीझन संपला तेव्हा २००० चा आकडा गाठण्यासाठी १५० भाग कमी होते. त्यामुळं नवीन सीझन हा फक्त १५० भागांचाच असेल असंही निर्माते म्हणाले.

स्मृती इराणी पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार ?

दुसऱ्या सीझनमध्ये तुलसीच्या भूमिकेत कोण असणार? याबद्दल चर्चा सुरू होत्या. यातच मोठा खुलासा झाला आहे. खुद्द स्मृती इराणी पुन्हा छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. 'क्यूं की सास भी कभी बहू थी' च्या दुसऱ्या सीझनमध्ये स्मृती इराणी दिसणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण त्या नेमक्या कोणत्या भूमिकेत असतील याबद्दल मात्र अद्याप माहिती समोर आली नाहीये. याबद्दल बोलताना एकता कपूर म्हणाली की, या दुसऱ्या सीझनध्ये राजकारणही असणार आहे. आम्ही आता मालिकेतही राजकारण आणतोय. इतकंच नाही तर राजकीय व्यक्तीला आम्ही मालिकेत आणतोय.तिच्या या वक्तव्यावरून आता स्मृती इराणी या टीव्ही इंडस्ट्रीत कमबॅक करू शकतात असं म्हटलं जातंय.