टेंबलाई मंदिर परिसरात सुशोभीकरणाचा डीपीआर तयार करा : राजेश क्षीरसागर यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना
कोल्हापूर ( प्रतिनिधी) : कोल्हापुरातील टेंबलाई मंदिर परिसरात सुशोभीकरणाचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी परिसराची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
टेंबलाई मंदिर परिसर गेली अनेक वर्षे मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहिला आहे. नवरात्रोत्सवासह वर्षभर या ठिकाणी हजारोंच्या संख्येने भाविक भेट देत असतात. परंतु, याठिकाणी असणाऱ्या सुविधा अपुऱ्या असल्याने भाविकांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे.
परिसरातील रस्ते सुसज्ज करण्यात यावेत. मंदिर परिसरात संरक्षक भिंत बांधण्यात यावी. यासह येणाऱ्या भाविकांच्या विरंगुळ्यासाठी उद्यान विकसित करण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली. यासोबतच पहिल्या टप्प्यातील सुशोभिकरणाच्या कामासाठी जिल्हा नियोजन समिती पर्यटन लेखाशिर्ष मधून रु.५ कोटी निधीची तरतूद करू अशी ग्वाहीही राजेश क्षीरसागर यांनी दिली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.आर.पाटील तसेच उप-अभियंता महेश कांजर यांच्यासह अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.