प्रधानमंत्री पीक विमा योजना : इच्छुकांनी 31 जुलै पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2025 - 26 अंतर्गत खरीप व रब्बी हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पिक उत्पादनावर विपरीत परिणाम करणा-या इतर बाबीमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे / तांत्रिक उत्पादन आधारे या महसूल मंडळामध्ये पिकांच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत होणारी घट गृहित धरुन नुकसान भरपाई देय राहणार आहे. यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी, पत्ता-मुंबई क्षेत्रिय कार्यालय, लोकचेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई या कंपनीची निवड करण्यात आली आहे. इच्छुकांनी 31 जुलै 2025 पर्यंत या विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.
प्रधनमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून राज्यात राबविण्यात येत होती. खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2024-25 अखेर 1 रु. प्रति अर्ज भरुन सर्वसमवेशक पिक विमा योजना राबविण्यात आली होती. या कालावधीत राबविलेल्या योजनेचा आढावा घेतल्यानंतर त्यामध्ये सुधारणा करुन राज्य शासनाने 24 जून 2025 च्या शासन निर्णयान्वये सन 2025-26 वर्षाकरिता उत्पादनावर आधारीत सुधारीत पिक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. खरीप हंगाम सन 2025 पासून सुधारीत पिक विमा योजना राबविण्यासाठी मार्गदर्शक सुचना प्राप्त झालेल्या आहेत. ही पीक विमा योजना बीड पॅटर्न (८०:११०) (Cup and Cap Model) आधारित 1 वर्षाकरिता अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविली जाणार आहे.
जोखमीच्या बाबी- योजने अंतर्गत खरीप व रब्बी हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पिक उत्पादनावर विपरीत परिणाम करणा-या इतर बाबीमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे / तांत्रिक उत्पादन आधारे या महसूल मंडळामध्ये पिकांच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत होणारी घट गृहित धरुन नुकसान भरपाई देय राहील.
योजनेतील पिके : खऱीप हंगाम - भात (जि), खरीप ज्वारी, नाचणी (रागी), सोयाबीन, भुईमूग, रब्बी हंगाम- गहू (बा), रब्बी ज्वारी (जि), हरभरा व उन्हाळी भुईमुग.
विमा कंपनी - भारतीय कृषी विमा कंपनी, पत्ता-मुंबई क्षेत्रिय कार्यालय, लोकचेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई. 400 059
विमा नुकसान भरपाई निश्चिती -
सरासरी उत्पादन काढताना कापूस, सोयाबीन, भात या निवडक पिकांच्या बाबतीत रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानद्वारे प्राप्त उत्पादनास 30 टक्के आणि पीक कापणीद्वारे प्राप्त उत्पादनास 70 टक्के भारांकन देऊन पिकाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे. उर्वरित पिकांचे बाबतीत पीक कापणीद्वारे प्राप्त उत्पादन गृहीत धरले जाणार आहे.
नुकसान भरपाई रु. = उंबरठा उत्पादन - प्रत्यक्ष आलेले सरासरी उत्पादन
-------------------------------------------- X विमा संरक्षित रक्कम रु. उंबरठा उत्पादन
विमा हप्ता जमा करणे -
कर्जदार शेतक-यासाठी विमा हप्ता भरण्याचे काम संबंधीत कर्जपुरवठा करणा-या बॅंका व विमा कंपनीकडे आहे. विमा हप्त्याची रक्कम अधिकचे कर्ज म्हणून बॅकांनी भरणे आवश्यक आहे. बिगर कर्जदार शेतक-यांनी त्यांचा विमा हप्ता सुलभ पध्दतीने भरता यावा यासाठी सर्व सुविधा केंद्र (सी एस सी) व्दारा संचलित आपले सरकार सेवा केंद्र उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच प्राधिकृत बॅंका प्राथमिक कृषी पतसंस्था / संबंधीत विमा कंपनीचे कार्यालय, विमा कंपनीचे जिल्हा अथवा तालुका प्रतिनिधी यांचेकडे जमा करावयाचा आहे.
सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे- 7/12 व 8 अ चा उतारा, बॅंक पासबुक झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स, स्वयंघोषणापत्र व शेतकरी ओळखपत्र क्रमांक (AGRISTACK farmer ID) इ.
अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका व जिल्हा प्रतिनिधी, राष्ट्रीयकृत बॅंका, महा-ई सेवा केंद्र, सर्व सेवा केंद्र (सीएससी) यांच्याशी संपर्क साधावा. अंतिम मुदतीपूर्वी पिक विमा पॉलिसी उतरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.