दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये चार मजली इमारत कोसळली; ४ मृत, बचावकार्य सुरु

दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये चार मजली इमारत कोसळली; ४ मृत, बचावकार्य सुरु

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुस्तफाबाद भागात शनिवारी पहाटे एक चार मजली इमारत कोसळली, ज्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

उत्तर पूर्व जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त संदीप लांबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जणांना वाचवण्यात यश आले असून त्यापैकी चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बचाव कार्य वेगाने सुरू आहे. अजूनही ८ ते १० लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि दिल्ली अग्निशमन दलाचे पथक, तसेच श्वान पथक घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पहाटे २:५० वाजता अग्निशमन दलाला या दुर्घटनेबाबत माहिती मिळाली, अशी माहिती विभागीय अग्निशमन अधिकारी राजेंद्र अटवाल यांनी दिली.

या इमारतीत अंदाजे २० ते २५ लोक राहत होते. सध्या ८ लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून GTB रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इमारत नेमकी कशामुळे कोसळली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी रात्री झालेला जोरदार पाऊस आणि वादळ ही एक संभाव्य कारणे मानली जात आहेत. यापूर्वीही, मधु विहार पोलीस स्टेशनजवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळून एकाचा मृत्यू व दोन जण जखमी झाले होते.