तरुण पिढीला कामात गुंतवून प्रोत्साहन द्या – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

तरुण पिढीला कामात गुंतवून प्रोत्साहन द्या – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) - एकीकडे शिक्षण जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच दुसऱ्या बाजूला एका विशिष्ट तरुण वयात रोजगारही महत्त्वाचा असल्याचे सांगून तरुणांना कामात गुंतवून त्यांना भविष्यात तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आबिटकर यांनी केले. कोल्हापूर शहरातील स्वामी विवेकानंद संस्थेच्या सभागृहात आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास विभाग व विवेकानंद संस्थेच्या संयुक्तकडून करण्यात आले होते. 

यावेळी पालकमंत्री अबिटकर म्हणाले, कौशल्य विभागाने औद्योगिक विकास महामंडळाच्या मदतीने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यातील संधीचा जास्तीत जास्त युवकांनी उपयोग करावा. उपस्थित 28 उद्योजकांनी 1470 रिक्त पदांसाठी उपलब्ध केलेली संधी मेळाव्यात आलेल्या हजारो तरुणांसाठी महत्त्वाची असून त्यांच्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ नक्कीच मिळेल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याकाळात सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून तरुणांना सहा हजार, आठ हजार, दहा हजार अशा वेगवेगळ्या पद्धतीने स्टायफंड देण्यात येतो. ही योजना तरुणांना वेगवेगळ्या ठिकाणी काम करीत असताना अधिकचे बळ देणारी आहे असे त्यांनी सांगितले. या मेळाव्यात एकूण 636 उमेदवार होते. पात्रतेनुसार 360 मुलाखती झाल्या त्यापैकी प्राथमिक निवड 247 तर अंतिम निवड 43 जणांची झाली. 

एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख यांनी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाबाबत माहिती देऊन तरुणांचा पुणे मुंबईकडे असणारा नोकरीचा कल कोल्हापूरकडे वाढावा यासाठी अधिकचे प्रयत्न व्हावेत असे मत व्यक्त केले. गोकुळचे अध्यक्ष स्वरूप कदम यांनी असा मेळावा दर महिन्याला व्हावा असे सांगून त्याचा युवकांनी लाभ घेत पुण्या मुंबईला न जाता कोल्हापुरातच पर्याय निवडावा असे आवाहन केले. सीईओ कौस्तुभ गावडे यांनी तरुणांचा देश असलेल्या देशात प्रत्येकाला नोकरी मिळावी व अशा मेळाव्या मधून ही संधी उपलब्ध होत असल्याचे सांगून हा एक आदर्श उपक्रम असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात जमीर करीम यांनी रोजगार मेळाव्याबाबत माहिती देऊन सुशिक्षित बेरोजगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांच्या कौशल्यानुसार वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देत मेळाव्याचे यशस्वी आयोजन जिल्ह्यात केले जात असल्याचे सांगितले. 

यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेचे अभयकुमार साळुंखे, सहायक आयुक्त कौशल्य विकास जमीर करीम, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, गोकुळ एमआयडीसीचे अध्यक्ष स्वरूप कदम, स्वामी विवेकानंद संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांच्यासह विविध उद्योजकांचे प्रतिनिधी, उमेदवार तरुण, विवेकानंद संस्थेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.