आणीबाणीत शिक्षा भोगलेल्या सत्याग्रहिंनी जागवल्या आठवणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) - संविधान वाचवण्यासाठी उठाव केला, प्रसंगी अनेक व्यक्तींना कारावास भोगावा लागल्याची माहिती आणीबाणीत शिक्षा भोगलेल्या सत्याग्रहिंनी दिली.
देशातील आणि जिल्ह्यातील आणीबाणीत कारावास भोगलेल्या गौरवमूर्तींवर आधारित चित्रप्रदर्शनाचे आयोजन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहाबाहेर आयोजित करण्यात आले आहे. या चित्रप्रदर्शनाला अनेक व्यक्ती व मान्यवरांनी तसेच आणीबाणी कालावधीत शिक्षा भोगलेल्या व्यक्तींनीही भेट देऊन पाहणी केली.
1975 मध्ये आणीबाणी जाहीर झाल्याच्या काळात अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली. सामान्य गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देत शिक्षा भोगल्यानंतर सोडण्यात आल्याची माहिती आणीबाणी दरम्यान कारावास भोगलेल्या कोल्हापूर येथील धोंडीराम पाटील यांनी दिली.
कराड येथे कार्यरत असताना आणीबाणी काळात दडपशाही विरोधी निषेध केल्याबद्दल तसेच आणीबाणी विरोधी निदर्शने केल्याबद्दल अटक करण्यात आली होती, अशी माहिती मुरलीधर गोपाळराव आळतेकर यांनी दिली.
आणीबाणी काळात राजाराम कॉलेज मध्ये शिकत असताना 22 डिसेंबर 1975 रोजी भोगावती कॉलेज येथे सत्याग्रह केला. यासाठी एक महिन्यांचा कारावास व 3 दिवसांची सक्त मजुरीची शिक्षा झाली. यानंतरही व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली. भारताची राज्यघटना शाश्वत राहण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे मत अभय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
1975 ते 1977 या आणीबाणी कालावधीत संविधान वाचवणे गरजेचे होते. यावेळी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली होती. येरवडा, नाशिक कारागृहात आणीबाणी कालावधीत लोकशाही करता लढा देताना एक महिन्याहून जास्त कारावास भोगावा लागल्याचे प्रभाकर दत्तात्रय गणपुले यांनी सांगितले.
आणीबाणी काळातील माहिती मिळाल्याचे नोंदवले अभिप्राय -
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आलेल्या प्रदर्शनातून आणीबाणी काळातील सविस्तर माहिती मिळाल्याची भावना चंद्रकांत भोपळे यांनी अभिप्राय नोंदवहीत नोंदवली. संविधानाने लोकांना त्यांचे अधिकार दिल्याच्या भावना उत्तम पाटील यांनी व्यक्त केल्या. हे प्रदर्शन उत्तम असून जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानपत्र दिल्याबद्दल काहींनी प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत. तर आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींची दखल शासनाने घेतल्याबद्दल शासन व प्रशासनाचे धन्यवाद! अशा भावना वसुंधरा मराठे, अरुण सोनाळकर यांच्यासह आणीबाणी काळात शिक्षा भोगलेल्या व्यक्तींनी अभिप्राय नोंदवहीत नोंदवल्या.
देशात सन 1975 ते 1977 मध्ये लागलेल्या आणीबाणी कालावधीत लढा देताना अनेक व्यक्तींनी सामाजिक व राजनैतिक कारणासाठी कारावास भोगला आहे. या घटनेला 25 जून रोजी 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात चित्र प्रदर्शनाच्या आयोजनासह कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. कोल्हापूर मधील या चित्रप्रदर्शनात कोल्हापूर जिल्ह्यातील कारावास भोगलेल्या व्यक्तींबाबतची माहिती, लोकशाहीचा इतिहास, लोकशाही बाबत घटनाक्रम, लोकशाहीचे प्राचीन काळातील टप्पे, आणीबाणी पूर्वीची, दरम्यानची व त्यानंतरची स्थिती, आणीबाणी दरम्यानच्या लोकांनी भोगलेल्या यातना यासह आणीबाणीशी संबंधित अन्य माहिती सविस्तरपणे प्रदर्शित करण्यात आली आहे.
हे चित्र प्रदर्शन २५ जून पासून पुढे दिवस सुरु राहणार असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या चित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.