नाथाजी पाटील यांना भाजपा जिल्हाध्यक्षपदी दुसऱ्यांदा संधी

कोल्हापूर (प्रतिनिधी) - गेली 30 वर्षे भारतीय जनता पार्टीत कार्यरत असणारे नाथाजी तुकाराम पाटील यांना भाजपा जिल्हाध्यक्षपदी दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. गेल्या वर्षभरात पाटील यांनी जिल्हाध्यक्ष पदाच्या माध्यमातून पक्षाचे संघटन, विस्तार, पक्षासाठी दिलेले योगदान याचा विचार करून त्यांची पुन्हा एकदा भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
पाटील हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून विद्यार्थी चळवळीत कार्यरत आहेत. तसेच माजी संचालक दूधंगंगा वेदंगा सहकारी साखर कारखाना बिद्री, माजी संचालक शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, माजी अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना समिती भुदरगड, माजी सरपंच ग्राम पंचायत आकुर्डे तालुका भुदरगड अशा विविध पदांचा पदभार सांभाळला आहे. त्रिमूर्ती संस्था समूहाच्या माध्यमातून विकास सेवा संस्था, दूध संस्था, वाचनालय, स्वयंरोजगार संस्था यांची स्थापना त्यांनी केली. भाजपचा शाखाध्यक्ष, तालुका सरचिटणीस, तालुकाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष अशा विविध पदांवर पाटील यांनी काम केले आहे.
या निवडीनंतर नाथाजी पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातल्या भाजपाच्या अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीचा रस्ता धरल्यानंतर, विधानसभा निवडणुकीपूर्वी माझ्यावरती जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आली. या आलेल्या जबाबदारीला पूर्ण न्याय देत कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचून भारतीय जनता पार्टी, तसेच महायुतीच्या सर्वच उमेदवारांसाठी पायाला भिंगरी बांधून प्रचार केला याचे फलित म्हणून जिल्ह्यातील सर्वच्या सर्व आमदार महायुतीचेच निवडून आले.
आता सुद्धा पक्षाच्या संघटनात्मक निवडी अंतर्गत माझ्यावर पुन्हा पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली असून आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच विभागात पक्ष संघटनेचे काम अतिशय नेटाने करेन. पक्षाचा विचार तळागाळात पोहोचवून सर्वाधिक नगरपालिकेचे जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीन.
या निवडी कामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , महसूल मंत्री व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील , कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. सुरेशराव हाळवणकर, खा. धनंजय महाडिक , आ. अमल महाडिक ,आ. शिवाजी पाटील, माजी मंत्री भरमु अण्णा पाटील, माजी आ. संजय बाबा घाटगे आदींनी ही जबाबदारी माझ्यावर दिली आहे त्यांनी टाकलेला विश्वास निश्चितच सार्थ ठरवू असा विश्वासही नाथाजी पाटील यांनी व्यक्त केला.