पालकमंत्र्यांच्या भुलथापा, अमिषे ,दडपशाहीला बळी पडू नका : दत्तोपंत वालावलकर
कापशी (प्रतिनिधी) : पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शासकीय योजनेचे लाभ घेणारे लाभार्थी निवडणुकीत जर त्यांच्या विरोधात जात असतील तर त्यांचे शासकीय योजनेतून मिळणारे लाभ तत्काळ बंद करण्याच्या धमक्या देत आहेत. खरं तर ही लोकशाहीची थट्टाच म्हणावी लागेल.त्यांच्या या दडपशाही आणि झुंडशाहीमुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानच धोक्यात आल्याचे निदर्शनास येत आहे.त्यामुळे जनसामान्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या या प्रवृत्तीच्या भूलथापा,अमिषे आणि दडपशाहीला बळी पडू नका असे आवाहन पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर यांनी केले.
तमनाकवाडा (ता.कागल) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच दत्ता चव्हाण होते.
वालावलकर पुढे म्हणाले, पालकमंत्री मुश्रीफ हे जाणीवपूर्वक शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना वेठीस धरत आहेत. समाजात भय आणि भ्रष्टाचाराने तर कळसच गाठलेला आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून पालकमंत्र्यांच्या जोखडात अडकलेल्या आपल्या समाजाला सोडविण्यासाठी आणि शाश्वत विकासाची दूरदृष्टी असलेल्या राजे समरजितसिंह घाटगे यांना निवडून देऊया असे सांगितले.
राजे समरजितसिंह घाटगे यावेळी बोलताना म्हणाले,पालकमंत्री महोदय कोल्हापूर येथे अकराशे बेडचे हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मग गेल्या पंचवीस वर्षात ज्या विधानसभा मतदारसंघाने त्यांना सत्ता दिली त्या मतदार संघातील जनतेच्या आरोग्य सुविधांसाठी तालुक्याच्या ठिकाणी पाचशे बेडचे हॉस्पिटल का उभे केले नाही ?असा सवाल उपस्थित करून केवळ आणि केवळ कंत्राटदारांचे हित जोपासणे एवढेच त्यांचे मनसुबे आहेत. त्यामुळे जनतेने आता वेळीच सावध होण्याची गरज आहे.आपल्या सर्वांच्या कुटुंबातील या सदस्याला एक वेळ आमदारकीची संधी द्या, तुम्हा सर्वांचा मान सन्मान जोपासण्यासाठी कोणतीही कमतरता ठेवणार नाही.
सागर कोंडेकर , दत्ता चव्हाण,सुरेश चौगले,अण्णाप्पा तिप्पे,जयदेव चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मोहन मोरे,भिकाजी तिप्पे,अण्णाप्पा तिप्पे,आप्पासाहेब तिप्पे,संजय बरकाळे,धोंडीबा तिप्पे,रोहण चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महादेव तिप्पे यांनी आभार मानले.....
शपथा द्या, भांडी घ्या......
यावेळी बोलताना दिलीप तिप्पे म्हणाले, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यामुळे मते मिळवण्यासाठी ते वेगवेगळी षडयंत्रे रचत आहेत. आता मागच्या दाराने भांडी वाटपाचा एक अजब फंडा विरोधकांनी सुरू केला आहे. ते घरोघरी सांगताहेत,शपथा द्या,भांडी घ्या. त्यांच्या नेत्यांचे हे संस्कार घराघरात पेरत आहेत.यामुळे लोकशाही धोक्यात आली असून आपल्या मुलाबाळांचे भविष्य घडविण्यासाठी अशा समाजविघातक प्रवृत्तीला मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवा.