प्रबोधनात्मक देखाव्यातून आदर्शवत कागल अशी ओळख निर्माण करूया ; राजे समरजितसिंह घाटगे
कागल (प्रतिनिधी) : गेली वीस वर्षांपासून लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या आदर्शवत कागलची ओळख "राजकीय विद्यापीठ" अशी जाणीवपूर्वक केली गेली.वास्तविक शाहूंच्या कागलची बदनामी करणारी ही ओळख सार्वजनिक गणेशोत्सवातील विविध प्रबोधनात्मक देखाव्यांच्या माध्यमातून पुसून टाकूया आणि शाहुंचे "आदर्शवत कागल " अशी पुन्हा नव्याने ओळख निर्माण करूया. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते, शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
मगर हॉल येथे राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या वतीने मोरया पुरस्कार व घरगुती गौरी गणपती ऑनलाईन सजावट स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कागल,मुरगुड, कापशी, गडहिंग्लज,उत्तूरसह कौलगे जि.प.मतदारसंघातील 154 मंडळांनी प्रबोधनात्मक देखाव्यांचे उत्स्फूर्तपणे सादरीकरण केल्याबद्दल तसेच घरगुती गौरी गणपती ऑनलाईन सजावट स्पर्धेतील 41 विजेत्या महिलांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते यथोचित गौरव करण्यात आला.
घाटगे पूढे म्हणाले, कागल विधानसभा मतदारसंघातील उच्चशिक्षित अनेक युवक-युवतींना रोजगारासाठी आजही बाहेर जावे लागते ही खरंतर शाहूंच्या कर्मभूमीची शोकांतिकाच म्हणावी लागेल. त्यामुळे येत्या काळात नवनवीन उद्योग व्यवसाय येथील औद्योगिक वसाहतींमध्ये आणण्यासाठी आपण प्राधान्य देणार असून परिवर्तनाच्या या लढाईत सर्वांनीच आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून आम्हाला साथ द्यावी असे आवाहन घाटगे यांनी केले.
प्रा.अमित कुलकर्णी,संकेत भोसले, अभिजीत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी राज्यस्तरीय भालाफेक परीक्षेत तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल अमृता सुभाष पाटील यांचा सत्कार राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील म्हणाले,राजे समरजितसिंह घाटगे यांचे समाजकारण आणि राजकारण योग्य दिशेने सुरू आहे. त्यामुळे यश हे नक्की आहे. गेल्या पंचवीस वर्षातील कागल तालुक्यातील मायबाप जनतेची परिवर्तनाची मागणी फक्त गणपती बापांच्या कृपेने पूर्ण करूया त्यासाठी सर्वांनीच कामाला लागावे असे आवाहन केले.
राजमाता जिजाऊ समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे म्हणाल्या, मोरया पुरस्कार आणि घरगुती गौरी गणपती सजावटीच्या माध्यमातून युवक-युवतींच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हाच उद्देश आहे. गेल्या आठ वर्षांपासून सुरू केलेल्या या उपक्रमांची नोंद घेऊन शाश्वत विकासाची दूरदृष्टी लाभलेल्या राजे समरजितसिंह घाटगे यांची पाठराखण येत्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता नक्की करेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी राजे विरेंद्रसिंह घाटगे,श्रेयादेवी घाटगे, यशराजे घाटगे, करणसिंह घाटगे, विजया निंबाळकर, शिवगोंडा पाटील, प्रदीप लोकरे,दगडू शेणवी, धोंडीराम सावंत यांच्यासह शाहू ग्रुपच्या सर्वच संस्थांचे सन्माननीय संचालक,पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला,तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी परीक्षक म्हणून प्रशांत वाळवेकर, चंद्रकांत कांबळे, मकरंद कोळी,अक्षय भोसले, प्रविण खोळांबे, रणजित पाटील, समरजित खराडे यांनी काम पाहिले.
स्वागत प्रास्ताविक अरुण गुरव यांनी केले. राजेंद्र माळूमल यांनी आभार मानले...
कॉपी-पेस्ट आमदार नको
यावेळी अमोल शिवई म्हणाले,स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या आदर्शवत संस्कारांमध्ये वाढलेले राजे समरजितसिंह घाटगे यांनी समाजकारण,राजकारण करत असताना आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशोत्सव,शिवजयंती,शिक्षक पुरस्कार,आणि मोरया पुरस्कार मोठ्या थाटात सुरू केले. विरोधक देखील आज राजे समरजितसिंह घाटगे यांच्या या उपक्रमांची कॉपी करत आहेत. याचा जनतेनेच आता विचार करावा. त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत असे कॉपी-पेस्ट करणारे आमदार नकोत.तर शाश्वत विकासाची दूरदृष्टी लाभलेले राजे समरजितसिंह घाटगे यांनाच विधानसभेत पाठवूया असे सांगितले.