प्रलंबित मागण्यासाठी पेन्शन संघटनेचे जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन..!
कोल्हापूर प्रतिनिधि : Dcps शिक्षक एकजुटीचा विजय असो,हमारी मांगे पूरी करो,हम सब एक है, सेवेतले हक्काचा लाभ देण्यासाठी टाळाटाळ का?न्याय्य मागण्याची दखल घ्या!,इनक्लाब जिंदाबाद!! ,इस शासन पर हल्लाबोल अशा घोषणानी परिसर दणाणून सोडत प्रलंबित मागण्यासाठी जुनी पेंशन संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद प्रवेशद्वाराजवळ एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. मंगेश धनवडे म्हणाले, प्राथमिक शिक्षकांना एकाच पदावर एकाच वेतनावर बारा वर्षे पूर्ण झाल्यास वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ दिला जातो. या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून डिसेंबर २०२२ पर्यंत बारा वर्षे पूर्ण होणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी लाभ देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रस्तावांची मागणी केली होती. पण जवळजवळ दोन वर्ष होत आलेली आहेत तरीही सदर वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्तावांना मंजुरी मिळालेली नाही. प्रस्तावांमध्ये प्रशासनाकडून वारंवार वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी काढण्यात येत आहेत. एकाच वेळी त्रुटी न काढता एक त्रुटी पूर्ण झाल्यानंतर दुसरी त्रुटी निदर्शनास आणून दिली जात आहे. या सर्व एकंदरीत प्रक्रियेस प्रचंड विलंब लागत असून पात्र शिक्षकांचे आर्थिक नुकसान होत आहे. या अनुषंगाने या अगोदर २ वर्षे जिल्हा प्रशासन शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. वारंवार भेटी घेण्यात आल्या आहेत. पण प्रस्ताव मंजुरी होण्यास विलंब लागत आहे. या बाबीमुळे कर्मचाऱ्यांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला आहे. म्हणून हे धरणे आंदोलन करण्याची वेळ आली आहे. या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाहीत तर लोकशाही मार्गाने भविष्यात आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी विजय रामाणे,संतोष गायकवाड,अमर वरुटे, मारुती फाळके, निलेश कारंडे, बालाजी पांढरे,आरती पोवार,रवी पाटील,अर्जुन पाटील,तानाजी घरपणकर,गजानन कांबळे, राज्यसह कोषाध्यक्ष श्रीनाथराव पाटील, शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन अमर वरुटे,मारुती फाळके जिल्हा मार्गदर्शक संजय भोसले, बी एल कांबळे, राहुल कांबळे, जिल्हा सरचिटणीस विजय रामाने, जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी पांढरे, जिल्हा कोषाध्यक्ष निलेश कारंडे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड, विश्वनाथ बोराटे, गजानन कुंभार, संजय पाटील, अमोल गायकवाड, जिल्हा प्रवक्ते प्रमोद पाटील, जिल्हा आयटी विभाग प्रमुख सुनील पाटील, जिल्हा महिलाध्यक्षा आरती पोवार, अनिल खांडेकर, राणेश्वर थोरबोले यांच्यासह विविध तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी, महिला शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.