आधी मनसे, मग वंचित!आता या नेत्याची थेट ठाकरे गटात प्रवेश!

आधी मनसे, मग वंचित!आता या नेत्याची थेट ठाकरे गटात प्रवेश!

मुंबई (प्रतिनिधी) :  लोकसभा निवडणुकीच्या आधी मनसेला जय महाराष्ट्र करुन वंचित बहुजन आघाडीत गेलेले वसंत मोरे हे चांगलेच चर्चेत राहिले होते. आता याच वसंत मोरेंनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाला महिना उलटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचीही साथ सोडली आहे आणि थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत हाती शिवबंधन बांधलं आहे. राज ठाकरेंचा एकेकाळचा पुण्यातला शिलेदार अशी ओळख असलेले वसंत मोरे हे आता व्हाया वंचित बहुजन आघाडीतून थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेला आहे.

वसंत मोरे यांनी आपल्या या निर्णयाबद्दल सविस्तर सांगताना म्हणाले, "मी वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकरांना मेसेज केला. साहेब मला माफ करा असं मी त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं. मला माझ्या पाठिशी असणार्या कार्यकर्त्यांचा विचार करणं गरजेचं आहे. मी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय हा विचार करुनच घेतला आहे. मला प्रकाश आंबेडकरांचा फोन आला होता पण मी त्यांना सांगितलं की आता खूप उशीर झाला आहे. मी गुरुवारीच उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आता मी पूर्वीच्या पक्षात जात आहे."या निर्णयामागे कार्यकर्त्यांचा विचार आणि राजकीय भविष्याची आखणी असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले आहे. वसंत मोरे यांची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जॉइनिंगने पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. वसंत मोरे यांचे मनसेतील योगदान, वंचित बहुजन आघाडीत प्रवेश, आणि आता शिवसेनेत जाणे या त्यांच्या राजकीय प्रवासाची चर्चा आता नव्या उंचीवर पोहोचली आहे.