रक्तदान आरोग्यासाठी फायदेशीर – जिल्हाधिकारी अमोल येडगे

रक्तदान आरोग्यासाठी फायदेशीर – जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) - निःस्वार्थपणे गरजू रुग्णांना रक्तदान करणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी रक्तदान फायदेशीर असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांनी राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून सारथी उपकेंद्र कोल्हापूर कार्यालयामार्फत आयोजित करणेत आलेल्या भव्य रक्तदान शिबिरास कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबोधित केले.

याप्रसंगी त्यांनी स्वतः रक्तदान केले व राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त रक्तदात्यांनी रक्तदान करुन रक्तदानाच्या या महान व पवित्र कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. हा कार्यक्रम सारथी उपकेंद्र कोल्हापूर कार्यालयामार्फत यशस्वीपणे सुरु असून यामध्ये सारथी संस्थेच्या अधिछात्रवृत्ती विभागाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. त्याचबरोबर सारथी संस्थेचे अधिकारी-कर्मचारी, इतर शासकीय विभागाचे अधिकारी- कर्मचारी व एमकेसीएल केंद्रांचे संचालक यांनीही या रक्तदान कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, रक्तदान हे केवळ दान नसून आरोग्याचे वरदान आहे. ते हृदयाला निरोगी ठेवते आणि अनेक रोगांपासून संरक्षण करते. रक्तदानामुळे नवीन रक्तपेशी तयार होतात आणि शरीर अधिक मजबूत होते. म्हणूनच रक्तदान आरोग्यासाठी उपयुक्त आहे. त्यांनी सर्वांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वतः रक्तदान करून उपस्थितांना प्रोत्साहन दिले. तसेच त्यांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्या इतर युवकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. प्रास्ताविक सारथी उपकेंद्र कोल्हापूरच्या सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी यांनी केले. त्या म्हणाल्या, सारथी, पुणे ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत मराठा, कुणबी या लक्षित गटासाठी कार्यरत आहे. महाराष्ट्रातील लक्षित गटाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी ही संस्था काम करते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची कर्तृत्वसंपन्न कारकीर्द ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक तेजस्वी पर्व आहे. समृद्धीची सर्व साधने उपलब्ध असताना शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात उपभोगशून्य स्वामित्व गाजवले. सत्तेचे साधन हाती असताना त्यांनी प्रजेचा उत्कर्ष साधण्यासाठी अथक प्रयत्न केले. जनतेच्या सर्वांगीण उन्नतीचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि ते साकार करण्यासाठी सर्वस्व अर्पण केले. अशा या महान कार्याला अभिवादन करत जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.