प्रा. पी. बी. घेवारी तीन पुरस्कारांनी सन्मानित
वाठार तर्फ वडगाव - अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे उपप्राचार्य प्रा. पी. बी. घेवारी यांना विविध संस्थांतर्फे तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचे श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने यांच्या हस्ते सत्कार व अभिनंदन करण्यात आले. यावेळी जि. प. माजी सदस्या मनिषा माने उपस्थित होत्या.
प्रा. घेवारी यांना रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट कोस्ट यांच्या वतीने 'नेशन बिल्डर ॲवॉर्ड', स्टार एज्युकेशन ॲवॉर्ड अंतर्गत जीवनगौरव पुरस्कार तसेच एज्युकेशन कनेक्ट प्लस या संस्थेतर्फे इंडियन एज्युकेशन ॲवॉर्ड अंतर्गत "टॉप १०० इन्स्पिरेशनल एज्युकेशन आयकॉन्स २०२४" असे तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
गेली २७ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारे प्रा. घेवारी यांचा अध्यापनाचा अनुभव, विद्यार्थीभिमुख उपक्रम तसेच विविध समित्यांवर केलेले कार्य, संशोधन, अध्यात्म व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत असलेले योगदान यामुळेच या पुरस्कारांनी सन्मानित केल्याची भावना संस्थाध्यक्ष विजयसिंह माने यांनी यावेळी व्यक्त केली.
सत्कारप्रसंगी प्रा. पी. बी. घेवारी म्हणाले, "माझ्या शैक्षणिक व सामाजिक वाटचालीत माझे कुटुंबीय, श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, महाविद्यालयातील सहकारी, आजी-माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी आदींचे प्रोत्साहन व सहकार्य लाभल्यामुळेच हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पुरस्काराने जबाबदारी आणखी वाढल्याचेही त्यांनी नमूद केले.”