९ ते २६ वर्षापर्यंतच्या मुलींना गर्भाशयाच्या कॅन्सर प्रतिबंधक मोफत लसीकरणासाठी प्रयत्नशील : मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ वर्षावरील आणि २६ वर्षापर्यंतच्या अविवाहित किशोरवयीन मुलींना गर्भाशयाचा कॅन्सर प्रतिबंधक मोफत लसीकरण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. बाजारात साधारणता दोन हजार रुपये किंमत असलेली ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस प्रतिबंधक म्हणजेच एच. पी. व्ही. ही लस सी. एस. आर. फंडातून सामाजिक बांधिलकी म्हणून मोफत लसीकरण राबविणार असल्याचेही, त्यांनी सांगितले.
कोल्हापुरात शेंडा पार्क येथे राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय नगरीतील आरोग्य संकुलात या मोहिमेसंदर्भात आयोजित प्राथमिक नियोजन बैठकीत मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. राधिका जोशी उपस्थित होत्या . या मोहिमेसाठी उपयुक्त माहिती संकलन म्हणून मंत्री श्री. मुश्रीफ यांनी वयानुसार किशोरवयीन मुलींची नावे आणि माहिती संकलित करण्याच्या सूचना अंगणवाडी व आशा स्वयंसेविका यांचे प्रशासन, प्राथमिक शिक्षण विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग यांना दिल्या.
यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ही फार मोठी गंभीर समस्या आहे. या आजारामुळे भारतात प्रत्येक आठ मिनिटाला एक महिला मृत्युमुखी पडत आहे. यावर इलाज म्हणून किशोरवयीन अवस्थेमध्येच एच. पी. व्ही. या लसीचे लसीकरण केल्यास या महाभयानक रोगाला प्रतिबंध घालता येतो. बाजारामध्ये या लसीची किंमत दोन हजार रुपये आहे. परंतु; सी. एस. आर. फंडाच्या माध्यमातून ही लस मोफत देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. राधिका जोशी यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, भारतात दर आठ मिनिटाला एक महिला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू पावत आहे. त्यावर प्रभावी इलाज म्हणून जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असलेले हे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस प्रतिबंधक लसीकरण आहे. हे सुरक्षित, प्रभावी आहे आणि कोणतीही हानी होत नाही. आतापर्यंत तीन हजार महिलांना लसीकरण केले आहे. लसीकरण घेतलेल्या कोणत्याही महिलेला कॅन्सर झालेला नाही, असे निरीक्षण पुढे आले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सत्यवान मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध पिंपळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, शिक्षणाधिकारी सौ. मीना शेंडकर, डाॅ. संजय रणवीर, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते.