सामाजिक न्याय दिनानिमित्त 26 जून रोजी समता दिंडीचे आयोजन

सामाजिक न्याय दिनानिमित्त 26 जून रोजी समता दिंडीचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 26 जून हा जन्मदिवस दरवर्षी "सामाजिक न्याय दिन" म्हणून साजरा केला जातो. सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी दिलेले योगदान व त्यांच्या कार्याचा आदर्श समाजासमोर यावा, या उद्देशाने हा दिन विशेषत्वाने साजरा केला जातो.

या दिनानिमित्त दिनांक 26 जून रोजी सकाळी 8.30 वाजता समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडी दसरा चौक येथून सुरु होवून व्हिनस कॉर्नर, माईसाहेब महाराजांचा पुतळा, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयमार्गे पुन्हा दसरा चौक येथे येणार आहे.

या समता दिंडीस सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास, औकाफ राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत. यासोबतच जिल्ह्यातील खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी, विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी दिली.