खरंच भाजप हिंदुत्त्ववादी आहे का?; असं का म्हणाले संजय राऊत ?
मुंबई : दादरमधील हनुमान मंदिरावरून आता भाजप आणि शिवेसेनेत चांगलीच जुंपली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आता भाजपला थेट आव्हान दिलं आहे. तुम्ही मंदिर तोडून दाखवावं, आम्हाला पाहायचं आहे, खरंच भाजप हिंदुत्त्ववादी आहे का? असा सवाल करत राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
भाजपच्या डोक्यात सडके कांदे, बटाटे आहेत. ते हिंदुत्वाचे बाप बनले का? हिंदूत्त्वाचा सातबारा त्यांच्या नावावर कोणी केला? या भाजप वाल्यांना हिंदुत्व कोणी शिकवलं? हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपचं बोट पकडून त्यांना हिंदुत्वाच्या वाटेवर नेलं. त्या वाटेवर सुद्धा यांनी खड्डे करून ठेवले हे आम्हाला काय हिंदुत्व शिकवतात? आमचं हिंदुत्व मतांसाठी ते आमचं जीवन आहे. हिंदुत्व आमची संस्कृती आहे. हिंमत असेल तर सावरकर यांना भारतरत्न द्या मग हिंदुत्वावर बोला, असं संजय राऊत म्हणाले.
...तर त्यांनी घंटा वाजवायला यावं
दादरमध्ये मंदिर आहे जे 80 वर्षांपूर्वी हमालांनी बांधले आहे, तेव्हा कोणत्या अडचणी आल्या नाहीत. आज संध्याकाळी तिकडे महाआरती होईल. या महाआरतीमध्ये मी, युवा नेते आदित्य ठाकरे, आमदार महेश सावंत तिथे हजारो शिवसैनिक, हमाल बांधव सामील होतील. भाजपची इच्छा असेल तर त्यांनी यावं घंटा वाजवायला. मंदिर तोडून दाखवावं, आम्हाला पाहायचं आहे, खरंच भाजप हिंदुत्त्ववादी आहे का? मंदिरावर बुलडोजर फिरवण्याआधी कोणाशी चर्चा करत नाहीत. त्या मंदिरात भाजपला मत देणारे अंधभक्तही असतील. विकासासाठी मुंबईतील आरमधील झाडे तोडत आहेत. इमारती, मंदिर तोडत बऱ्याचं गोष्ट नष्ट करत असल्याचं संजय राऊत यांन म्हटलं आहे.