महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर आखाड्यांनी घेतला 'हा' मोठा निर्णय

प्रयागराज : आज मध्यरात्री महाकुंभमेळ्यात एकच्या सुमारास मोठी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये सतरा पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू झाला तर अनेक लोक जखमी झाल्याची माहिती दिली जात आहे. असे असताना आता आखाड्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कुंभमेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर अमृतस्नान रद्द करण्यात आले आहे.
महाकुंभातील चेंगराचेंगरीबाबत लखनौपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र चर्चा सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी महाकुंभातील परिस्थितीचा आढावा घेतला असून, आवश्यक त्या सूचना देखील केल्या आहेत. दरम्यान, अमित शाह यांनी योगी आदित्यनाथ यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
आखाड्यांसाठी राखीव असलेले रस्ते सर्वसामान्यांसाठी खुले
आखाड्यांसाठी राखीव असलेले रस्ते सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. या चेंगराचेंगरीनंतर सकाळी परिस्थिती सामान्य झाली. असे जरी असले तरी आखाड्यांनी यावर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कैलाशानंद गिरी जी म्हणाले की, संतांचे जीवन हे केवळ मानवांसाठी असते. संत नेहमी इतरांसाठी काम करतात. त्यामुळे परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही आज अमृतस्नान घेणार नाही असा निर्णय घेतला. आम्ही वसंत पंचमी मोठ्या उत्साहात साजरी करू.
महाकुंभात होणारी भाविकांची मोठी गर्दी पाहता मेळाव्याच्या अधिकाऱ्याने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. मेळा पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व आखाड्यांशी चर्चा सुरू आहे. अमृतस्नानाची वेळ काही काळानंतर निश्चित होऊ शकते. आखाड्यांनी स्नान करावे अशी आमची इच्छा आहे, पदाधिकारी त्यांची व्यवस्था करत आहेत. आखाड्याच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. सर्व बॅरल ब्रिज आणि बॅरिकेड्स उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संगम नाक्यावर गर्दी जमू नये, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.